बियाणे उगवण क्षमतेबाबत जनजागृती

शेतकर्‍यांचा उस्त्फूर्त प्रतिसाद

नांदगाव पेठ/30 जून : पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना नांदगाव पेठ या गावामध्ये बीज उगवण क्षमता चाचणी या विषयावर जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गावातील शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती लक्षपूर्वक ऐकली. तसेच बीज उगवण, अंकुरणातील अडचणी, बियाण्यांची गुणवत्ता आणि उगवण टक्केवारी यासंदर्भातील विविध शंकांचे निरसन विद्यार्थ्यांनी केले. यावेळी रावे विद्यार्थ्यांनी गोणी पिशवी पद्धतीने बीज उगवण क्षमता तपासण्याचे महत्त्व शेतकर्‍यांना समजावून सांगितले. बियाणे पेरणीपूर्वी त्यांची उगवण क्षमता तपासल्यास चांगल्या प्रतीचे बियाणे निवडता येते, पेरणीतील नुकसान टाळता येते तसेच अपेक्षित रोपसंख्या मिळविण्यास मदत होते, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान गोणी पिशवी पद्धतीचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे अवलंब कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या पद्धतीमुळे शेतकर्‍यांना कमी खर्चात व सोप्या पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता तपासता येते. परिणामी पिकांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होऊन आर्थिक फायदा मिळू शकतो, अशी माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल ठाकरे सर, उपप्राचार्य प्रा. नितेश चौधरी सर, वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. अदिती रजाणे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. मोनाली पोटे मॅडम तसेच रावे कार्यक्रम प्रभारी श्वेता देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रावे विद्यार्थिनी नंदिनी खांडरे, निवेदिता नखाले, सृष्टी रुदरकर, राधा वानखडे आणि श्रुती पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित शेतकर्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मार्गदर्शनपर कार्यक्रमांची भविष्यातही आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Back to top button