मंत्र्यांची ही अवस्था तर सामान्यांचे काय?
आ.विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

मंत्री संजय शिरसाटांच्या घरावर झाला होता हल्ला
चंद्रपूर/13 नोव्हेंबर -शिवसेना शिंदे गटाचे आमदार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर प्रतिक्रिया देत शिरसाट यांनी म्हटले की, माझी ही अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? अशा शब्दांत त्यांनी हतबलता व्यक्त केली आहे. यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले की, निष्क्रिय महायुती सरकारच्या काळात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. महिला, मुली तर सुरक्षित नाहीतच, पण आता मंत्रीही सुरक्षित नसल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे.
हल्ला झालेल्या मंत्र्यांनाच जर माझी ही अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? अशी हतबलता व्यक्त करावी लागत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार? खुद्द कॅबिनेट मंत्र्यांच्या घराबाहेर दारू पिऊन हल्ला होत असेल आणि त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसेल, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.





