छठपूजेसाठी 150 भाविकांचे कडक व्रत

मावळत्या आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य, छत्री तलाव घाटावर चार दिवस उत्सव

अमरावती/13 नोव्हेंबर– सूर्याची उपासना आणि निसर्गाशी नातं जपणारा छठपूजेचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यंदा 150 भाविक कडक व्रत करणार असून, 15 नोव्हेंबरला मावळत्या सूर्याला, तर 16 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाणार आहे. छत्री तलाव घाटावर होणार्‍या या चार दिवसीय सोहळ्यात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, पारंपरिक पूजाविधी, महाआरती आणि प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
छठपूजा आयोजन समितीचे दिनेश सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या सणाची सुरुवात नेपाळच्या सीमेलगत राहणार्‍या बिहारी कुटुंबांसह गया आणि सारनाथ परिसरातून झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढे या पूजेचा प्रसार देशभर झाला. मावळत्या आणि उगवत्या अशा दोन्ही सूर्यांची पूजा करणे हे या सणाचे खास वैशिष्ट्य आहे. जीवनातील सुख-दुःख स्वीकारून पुढे जाण्याचा संदेशही या परंपरेतून मिळतो. 13 नोव्हेंबरपासून महिलांच्या उपवासाला सुरुवात होईल. 14 नोव्हेंबरला मातीच्या चुलीवर पोळी आणि खीर तयार केली जाईल. संध्याकाळी भोजन केल्यानंतर निर्जला व्रत सुरू होईल. 15 नोव्हेंबरला संध्याकाळी भाविक तलावाच्या पाण्यात उतरून मावळत्या सूर्याला अर्घ्य देतील. 16 नोव्हेंबरला सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करून अर्घ्य अर्पण केले जाईल. त्यानंतर सूर्यदेवाची महाआरती आणि प्रसाद वाटप होणार आहे. या पूजेत केळी, लिंबू, संत्री, ऊस, गूळ, आवळा, नारळ, शिंगाडा, गाजर आणि मुळा यांसारख्या हंगामी फळे व भाज्यांचा वापर केला जातो. बांबूच्या टोपल्या, सूप आणि मातीच्या भांड्यांनाही विशेष महत्त्व आहे. बांबूला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पूजेतील नैसर्गिक साहित्यामुळे पर्यावरणाशी असलेले नातेही अधोरेखित होते. भाविकांनी व्रताचे नियम पाळून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन दिनेश सिंह यांनी केले.
छठपूजेतील नैसर्गिक साहित्याचे महत्त्व- छठपूजेत आवळा, आले, हळद, लिंबू, केळी, अननस, नारळ, ऊस, गूळ आणि शिंगाडा यांसारख्या पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांना पारंपरिक आहारात महत्त्व आहे. बांबूच्या टोपल्या, सूप आणि मातीच्या भांड्यांमुळे पर्यावरणपूरक परंपरा जपली जाते. सूर्याची उपासना करण्यासोबतच स्वच्छता, आरोग्य आणि निसर्गाचे महत्त्व सांगणारा हा सण समाजाला एकत्र आणतो. पुढील पिढ्यांपर्यंत ही परंपरा पोहोचवणे गरजेचे आहे.

Back to top button