मोदींचा शरद पवारांच्या आठ खासदारांवर डोळा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी डाव

नवी दिल्ली/13 नोव्हेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा विलिनीकरण हा अंतर्गत प्रश्न असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आहे तो आमच्या महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे.पवारसाहेब स्वतः एक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या पक्षात काय चाललंय याच्याबद्दल तर्क वितर्क करणं काही योग्य होणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचं आहे, त्यासाठी त्यांना 15-16 खासदारांची गरज आहे.त्यामुळं शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदींना परिसीमन विधेयक म्हणजे डिलिमिटेशन बिल आणायची घाई झालेली आहे.ते विधेयक महिला आरक्षणाचं नाव सांगून पुढे केलं जातंय.पण ही निव्वळ फसवणूक आहे, कारण महिला विधेयक 2023 मध्ये पारित झालेलं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. आता नवीन महिला विधेयक काय आणणार त्यांना परिसीमन करायचं आहे जो त्यांचा अधिकार आहे. पण परिसीमन करताना दक्षिणेच्या राज्यावर अन्याय होणार नाही हा मुख्य मुद्दा आहे. मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस बाबत जी चर्चा सुरु आहे, ती यासाठी चालू आहे की त्यांना परिसीमन विधेयक पास करण्यासाठी 15-16 मतांची गरज आहे. कारण ते घटना दुरुस्ती विधेयक आहे आणि 15-16 मतं कशी गोळा करायची हा प्रश्न आहे. कदाचित त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांवर डोळा आहे.हे खासदार आले तर आपली ती संख्या पूर्ण व्हायला मदतहोईल आणखी मग पाच ते सात मतं लागतील. पण ती मिळवतील कारण सगळाच पैशाचा खेळ चाललेला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय बदल होणार आहेत याचा थेट संबंध नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयक पारित करायचे त्याच्याशी आहे. आता पुढे काय घडतं हे दोन-तीन दिवसात आपल्याला कळेल.

Back to top button