3.75 लाख ग्राहकांच्या नोंदी चोरीला

‘एसबीआय’च्या आयटी सेंटरवर सायबर हल्ला

मुंबई /13 नोव्हेंबर : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नवी मुंबईतील ग्लोबल आयटी सेंटरमध्ये सायबर घुसखोरी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सीबीडी बेलापूर येथील बँकेच्या माहिती तंत्रज्ञान केंद्रातील सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करून महत्त्वाच्या प्लिकेशन्समधील सुमारे तीन लाख 75 हजार नोंदी चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. चोरी केलेला डेटा डार्क वेबवर प्रसारित केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. देशातील कोट्यवधी ग्राहकांची डिजिटल बँकिंग सेवा हाताळणार्‍या बँकेच्या महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञान केंद्रातच घुसखोरी झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 4 वाजून 13 मिनिटांपासून 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा प्रकार घडला. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 11 मधील प्लॉट क्रमांक 8, 9 आणि 10 येथे एसबीआयचे ग्लोबल आयटी सेंटर आहे. या केंद्रातील सर्व्हरमध्ये अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत प्रवेश केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या सायबर घुसखोरीमागे ‘”Siriusim’ या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती अथवा हॅकर समूह आणि 64.105.72.172 या आयपी पत्त्याचा वापर करणारी अज्ञात व्यक्ती यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाआहे. या माध्यमातून बँकेच्या डिजिटल यंत्रणेतील महत्त्वाच्या माहितीपर्यंत अनधिकृतरीत्या पोहोचून ती बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे.पीडीएफ फाइल्सच्या तपशिलानुसार, त्यापैकी दोन हजार 63 फाइल्स स्वतंत्र हॅश मूल्य असलेल्या, तर 658 फाइल्स डुप्लिकेट असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या माहितीचे स्वरूप आणि व्याप्ती तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. हा डेटा डार्क वेबवर प्रसारित झाल्याची तक्रार असली, तरी त्यामध्ये ग्राहकांची नेमकी कोणती माहिती आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. खाते क्रमांक, पासवर्ड किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चोरीला गेल्याचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

32 फाइल्समधील नावांवर अटॅक
या हल्ल्यात दोन प्लिकेशन्सशी संबंधित मोठ्या प्रमाणातील माहिती चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामध्ये 32 सीएसव्ही फाइल्समधील एकूण तीन लाख 75 हजार नोंदींचा समावेश आहे. याशिवाय दोन जेएसओएन फाइल्स आणि दोन हजार 721 पीडीएफ फाइल्सही अनधिकृतरीत्या मिळविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Back to top button