जामनेर तहसील कार्यालयात अस्वच्छतेचा कहर

मंत्री गिरीश महाजनांनी स्वत हातात घेतला झाडू, अधिकारी-कर्मचार्‍याची कान उघाडणी

जळगाव /12 नोव्हेंबर- भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन कायम काही ना काही कारणाने चर्चेत असतात. कधी हलगीच्या तालावर ठेका धरताना तर कधी जिममध्ये कसरत करताना महाजन यांचे फोटो, व्हिडिओ समोर आलेत. मात्र आज जळगावच्या जामनेरमध्ये चक्क हातात झाडू घेऊन सरकारी कार्यालयाची साफसफाई करताना महाजन दिसून आले. ही घटना जामनेर तहसील कार्यालयात घडली आहे. जिथे कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन चांगलेच संतापले. त्यानंतर हातात झाडू घेऊन त्यांनी स्वच्छता सुरू केली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयातील अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्री गिरीश महाजन पत्रकार परिषदेसाठी तहसील कार्यालयात पोहचले होते. त्यावेळी कार्यालय आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली.
या प्रकारामुळे मंत्री महाजन वैतागले. त्यानंतर संतापलेल्या महाजनांनी थेट स्वत: हातात झाडू घेऊन कार्यालयाची स्वच्छता करू लागले. कार्यालयात मोठ्या प्रमाणात जाळ्या आणि कोळीष्टके साचल्याचे दिसून आले. महाजनांचा हा अवतार पाहून सरकारी अधिकारी-कर्मचारीही अवाक् झाले. कार्यालयातील अस्वच्छतेमुळे मंत्र्यांनाच हातात झाडू घ्यावा लागल्याचा हा प्रकार समोर आला तेव्हा कर्मचार्‍यांची पळापळ सुरू झाली.दरम्यान, अस्वच्छेतेसोबतच तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहात चक्क दारूच्या बाटल्याही आढळून आल्या. घडलेल्या प्रकारामुळे संतप्त मंत्री गिरीश महाजनांनी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला. शासकीय कार्यालयातील अस्वच्छतेअभावी महाजनांनी तिथल्या अधिकारी-कर्मचार्‍यांची खरडपट्टी काढली. आज मी तहसील कार्यालयात बैठकीसाठी आलो होतो. जेव्हा मी इथं पोहचलो तेव्हा माझ्या डोक्यालाच जाळी लागत होती. खोलीत शिरताना जाळी लागली. सगळीकडे अस्वच्छता होती. 500 रूपये दंडाचे बोर्ड मोठे लावले, पण जागोजागी थुंकल्याचे दिसून येते. टॉयलेटमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. अतिशय दुर्गंधी याठिकाणी होते. त्यामुळे बैठक राहू द्या, अगोदर साफसफाई करून घेऊ असं म्हणत मी झाडू हाती घेतला. मला हे दृश्य पाहून धक्का बसला. एवढी चांगली इमारत बांधली पण स्वच्छता नाही. कुणी साफसफाई करत नाही. मला स्वत:ची लाज वाटली. त्यामुळे झाडू घेतला. ही आपली जबाबदारी नाही का असं सांगत गिरीश महाजनांनी अधिकार्‍यांना फटकारले.

Back to top button