राज्य खेळाडूचा वाठोड्यात अपघाती मृत्यू
ऐन भाऊबिजेच्या दिवशी कुटुंबावर घाला

नागपूर /12 नोव्हेंबर: उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर राज्य संघात निवड झालेल्या सेपक टॅकरा संघांतील उदयोन्मुख तरुण महिला खेळाडूचा बुधवारी सायंकाळी अपघाती मृत्यू ओढवला. अवनी किशोर बघेले (18) असे अपघातात दगावलेल्या तरुण सेपक टॅकरा खेळाडूचे नाव आहे. अवनीची राज्य संघात निवड झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. ती अजनी रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करत होती.
नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवनी हीचा भाऊ वाठोडा परिसरात राहतो. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाट तरोडी परिसरात राहणारी अवनी ही भाऊबीजेचा सण असल्याने भावाला ओवाळण्यासाठी नंदनवन येथून वाठोडा कडे आई माधुरी मुकेश बघेले यांच्यासोबत दुचाकीने जात होती. तिची आई माधुरी या वाहन चालवत होत्या. सायंकाळी सातच्या सुमारा श्रावण नगरातील संघर्ष नगर चौकात वाहतूक पथदिवा लाल रंगाचा झाल्याने आईने वाहन चौकात थांबवले. दरम्यान काही सेकंदात सिग्नल सुरू झाला. तोच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या तुषार बबन बहोते याने बघेले यांच्या वाहनाला कट मारला. त्यामुळे माधुरी यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही कळायच्या आत अवनी डोक्याच्या भारावर खाली पडली. त्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादम्यान डॉक्टरांनी अवनीला मृत घोषित केले. वैद्यकीय सुचनेनंतर पोलिसांनी वाहन चालक तुषार बहोते विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. खेळाच्या माध्यमातून अवनी बघेले या खेळाडूने नेत्रदीपक कामगिरी करत राज्य संघात आपले स्थान मिळवले होते. दमदार खेळाच्या धर्तीवर राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी ती शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर नियमित सरावही करत होती. मात्र तिच्यावर एन भाऊबिजेच्या दिवशी काळाने घाला घातल्याने कुटुंबाच्या स्वप्नांची राख झाली असून अवनी सोबत सराव करणार्या अन्य खेळा़डूंनाही मानसिक धक्का बसला आहे.





