बजाजनगर हत्याकांडातील मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक

नागपूर/10 नोव्हेंबर-पिपळा फाटा येथील तरुण अमन उर्फ बॉबी सुनील सपाटे (27) याची निर्घृण हत्या करून त्याच्या कुटुंबियांच्या जीवनात कायमचा अंधार पेरणारा अट्टल गुन्हेगार अक्षय किशोर मडावी (29) याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्यासह अन्य चार आरोपींनाही पोलिसानी अटक केली.
अक्षय किशोर मडावी (29, फुटाळा वस्ती), पीयूष महेश नेनवानी (31, अनुपमा माईन स्टोन, जरीपटका), समीर विजय कावळे (23, आदिवासीनगर, गिट्टीखदान), आदित्य किशोर कळसकर (19, नवीन फुटाळा) आणि सुजल राजू सिडाम (21, जुना फुटाळा) अशी आरोपींची नावे आहेत. सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी मृत अमनचा मित्र प्रसाद राऊत याचा वाढदिवस होता. त्यामुळे रविवारी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अमन, अक्षय गंगाधर नौकरकर हे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात होते. देवनगर चौकात अमनच्या मित्राने कार उभी केली. तेथे आरोपी कारसमोर फटाके फोडत होते. अमनने फटाके फोडणार्‍यांना हटकले असता आरोपी अक्षय मडावी व त्याच्या साथीदारांनी अमनला मारहाण केली तर, मडावीने चाकू काढून अमनच्या पोटात खुपसला. नजिकच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार मिळाले नसल्याने खूप रक्तस्त्राव झाला आणि मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऐन दिवाळीच्या रात्री ही घटना घडल्याने उपराजधानीतील नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बजाजनगरच्या ठाणेदाराला पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात हलविले. निरपराध बॉबी सपाटेची हत्या केल्यानंतर आरोपी मडावी त्याच्या साथीदारांसह पीयूष नेनवानी याच्या घरी गेला. त्याला खुनाची माहिती दिली. गंभीर गुन्हा केल्याचे माहित असूनसुद्धा पियुषने आरोपी मडावीच्या लपण्याची आणि पसार होण्याची सोय करून दिली. त्याला जेवण केल्यानंतर रात्रभर आश्रय दिला. मोबाईल, सिम कार्ड देऊन त्याची पळून जाण्याची व्यवस्था केली.

Back to top button