दिवाळीच्या अंगणात साकारली शिवसृष्टी; ग्रामीण भागात किल्ला संस्कृतीचा वारसा आजही जिवंत!
बालहातांतून जपली जाते परंपरा, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा

अंजनगाव सुर्जी/10 नोव्हेंबर-: दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर आकाशकंदील, नवनवीन कपडे पणत्यांचा लखलखाट, फराळाचा सुगंध अन् फटाक्यांची आतषबाजी उभी राहते; मात्र ग्रामीण महाराष्ट्रात मातीचा किल्ला हे दिवाळीचे मोठे आकर्षण आजही तितक्याच उत्साहाने पाहायला मिळते.
आधुनिकतेच्या झगमगाटात अनेक पारंपरिक गोष्टी मागे पडत असताना अंजनगाव सुर्जी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात लहानग्यांनी किल्ला संस्कृतीची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. मातीच्या ढिगार्याला आकार देत, शेणाने सारवून, दगड-धोंडे रचून अन् कल्पकतेतून ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती साकारत बालपणातील दिवाळीला एक वेगळाच रंग दिला जात आहे.दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच गल्लीबोळात मुलांची लगबग सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यासाठी लहान मुलांमध्ये जणू चढाओढच लागते. रायगड, प्रतापगड, राजगड, सिंहगड, सिंधुदुर्ग, मुरूड-जंजिरा, तोरणा, पुरंदर, पन्हाळगड, लोहगड, विसापूर अन् शिवनेरी अशा ऐतिहासिक दुर्गांच्या प्रतिकृती साकारताना मुलांचा उत्साह ओसंडून वाहतो. या किल्ल्यांवर मावळ्यांच्या मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, भगवा ध्वज, तोफा अन् पहारेकरी यांची आकर्षक मांडणी केली जाते. यामुळे मुलांना सहकार्य, नियोजन, मेहनत अन् संघटित कामाचे महत्त्व शिकायला मिळते. डिजिटल मनोरंजनाच्या विळख्यात बालपण अडकत असताना ग्रामीण भागातील ही परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे.





