राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड
गोकुळवर अखेर महायुतीचा झेंडा

सतेज पाटलांना धक्का; शासननियुक्त 4 मतं ठरली निर्णायक
कोल्हापूर/10 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर आज पार पडली असून या निवडणुकीत महायुतीच्या राजेश पाटील यांचा विजय झाला आहे. महायुतीच्या राजेश पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांचा पराभव केला. महायुतीच्या उमेदवाराला 16 मते मिळाली तर सतेज पाटलांच्या उमेदवाराला 13 मते मिळाली. या निवडणुकीनंतर गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील यांनी सर्व मतदारांचे आभार मानत गोकुळच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसंच यावेळी राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीलाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणुकीत आमच्या पॅनलचे नेतृत्व करणारे माझे नेते हसन मुश्रीफ, या जिल्ह्याचे नेते चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही 63 वर्षांनंतर चंदगडसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागाला गोकुळच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळालं आहे. हसन मुश्रीफ यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जिल्हा दूध संघाची जबाबदारी सोपवली आहे. मला विश्वास आहे की, येणार्या वर्षभराच्या कालावधीत सर्व संचालकांना सोबत घेऊन जिल्ह्यातील दूध उत्पादकांचं आणि गोकुळ संस्थेचं वैभव कशा पद्धतीने वाढवता येईल, या प्रयत्न आपण करणार आहोत. गोकुळसारखी संस्था राज्यभर नावाजली जाते, आता ही संस्था देशपातळीवर कशा पद्धतीने नेता येईल, त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. गेल्या वर्षभरात झालेला तोटा भरून काढला जाईल, असं आश्वासनही राजेश पाटलांनी दिलं आहे.
सतेज पाटलांच्या पॅनलला आवाहन
या निवडणुकीत विरोधी पॅनलमधून लढलेल्या संचालकांनाही माझी विनंती असणार आहे की, निवडणूक संपलेली आहे, चेअरमन निवड झालेली आहे. कोर्टाच्या माध्यमातून आदेश प्राप्त झालेला आहे, त्यामुळे आता इतर कोणत्या गोष्टी करण्यापेक्षा दूध उत्पादकांच्या हिताच्या गोष्टी तुम्ही आम्ही हातात हात घालून करणं गरजेचं आहे. आता झालं गेलं ते विसरून जाऊन एकदिलाने आणि एकमनाने गोकुळच्या हिताचं कार्य करूया आणि बाकीचं राजकारण बाजूला ठेवूया, असं ते म्हणाले.





