भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
कोकर्डा फाट्यावर टाटा नेक्सॉनची दुचाकीला जोरदार धडक

अंजनगाव सुर्जी/10 नोव्हेंबर: अंजनगाव-दर्यापूर मार्गावरील कोकर्डा फाट्यानजीक 9 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला.भरधाव वेगाने जाणार्या टाटा नेक्सॉन चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दुसर्या युवकाचा अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.दोघेही मित्र असून नवगाजी प्लॉट परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कार चालक हा एमएच 27 बीझेड 1924 क्रमांकाची टाटा नेक्सॉन कार घेऊन अंजनगावकडून दर्यापूरकडे जात होता.याचवेळी दर्यापूरकडून अंजनगावकडे दुचाकीने येणारे अब्दुल साकीब अब्दुल सलीम आणि वाहीद खान इसाक खान हे कोकर्डा फाट्यावर आले असता कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.या धडकेत अब्दुल साकीब अब्दुल सलीम वय वर्षे (18) नवगज्जी प्लॉट अंजनगाव सुर्जी यांचा जागीच मृत्यू झाला,तर वाहीद खान ईसाक खान वय वर्षे (19) रा.भालदारपुरा अंजनगाव सुर्जी यांना उपचारासाठी अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. कारचालक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली.या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास ठाणेदार प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





