दिवाळीच्या रात्री अंबानगरित 18 ठिकाणी अग्नितांडव

भाजीबाजारातील सायकल दुकान खाक; 10 लाखांचे नुकसान

विलास नगरातील घटनेत अडीच लाखांची वाहने जळाली

अमरावती/9 नोव्हेंबर – दिवाळीच्या रात्री फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे शहरात आगीच्या घटनांनी चांगलीच धावपळ उडवली. रविवारी रात्री शहरातील तब्बल 18 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये भाजीबाजारातील सायकल दुकानातील साहित्य जळून सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले, तर विलास नगरातील गल्ली क्रमांक 4 मध्ये फॅशन प्रो आणि क्टिव्हा ही वाहने जळून अडीच लाखांचा फटका बसला. याशिवाय साबणपुरा येथील घराच्या छतावर, बडनेरा मार्गावरील मोकळ्या जागेत, विविध भागांतील कचर्‍याच्या ढिगांना आणि गवताला आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कचर्‍याने पेट घेतल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.
दिवाळीच्या रात्री भाजीबाजारातील सायकल दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत दुकानातील सायकलचे साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. विलास नगरातील गल्ली क्रमांक 4 येथे सुनील बन्सीलाल चौहान यांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. येथे फॅशन प्रो आणि क्टिव्हा ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले. साबणपुरा येथे रवी बजरंगलाल अग्रवाल यांच्या घराच्या छतावर फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. यात छतावरील कचरा जळाला. त्यांनी रात्री 11.45 वाजता अग्निशमन दलाला कळविले. बडनेरा मार्गावर ज्युडिओ वस्त्रदालनासमोरील मोकळ्या जागेतही आग लागली. हार्दिक उमेश व्यास यांनी याची माहिती दिल्यानंतर गवत आणि कचर्‍याला लागलेली आग विझविण्यात आली. नमुना गल्ली क्रमांक 4 येथे रात्री 11.45 वाजता, दिल्ली शाळेजवळ 11.39 वाजता, जुना मोटार स्थानक परिसरातील मरकज मशिदीजवळ 10.10 वाजता तसेच बेलोरा हॉटेल तंदुरी राईसजवळ कचर्‍याला आग लागली. जवाहर गेट परिसरातील मोकळ्या मैदानातील कचरा आणि गवताने पेट घेतल्याची माहिती लखनलाल व्यास यांनी दिली. रविवारी पहाटे 5.10 वाजता अकोला अर्बन बँकेच्या जयस्तंभ चौक शाखेजवळही आग लागली. गोविंद राठी यांनी दिलेल्या माहितीनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बँक परिसरातील कचर्‍याला लागलेली आग विझवली.
जयस्तंभ चौकातील पेट्रोलपंपाजवळील कचर्‍याच्या ढिगालाही आग लागली होती. सुशील साहू यांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले. हिंदू स्मशान संस्थानच्या गोदामालाही आग लागून मोठ्या प्रमाणात लाकूड जळाले. संस्थेचे विश्वस्त राजू मधुकर यांनी रात्री 2.25 वाजता अग्निशमन दलाला कळविले. दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

फटाक्यांच्या ठिणग्यांपासून सावध राहा
दिवाळीत फटाके फोडताना सुरक्षिततेची काळजी न घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते, हे या घटनांमधून पुन्हा स्पष्ट झाले. घरांच्या छतांवर, दुकानांसमोर आणि मोकळ्या जागांमध्ये साचलेला कचरा तसेच सुकलेले गवत फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे पेट घेऊ शकते. त्यामुळे कचर्‍याची वेळीच विल्हेवाट लावणे, फटाके ज्वलनशील वस्तूंपासून दूर फोडणे आणि आग दिसताच अग्निशमन दलाला कळवणे गरजेचे आहे. नागरिकांनी थोडी खबरदारी घेतल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.

Back to top button