मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज!

पाच महिन्यांपासून बंद असलेली ‘ओल्ड मंक’ पुन्हा बाजारात

मुंबई/9 नोव्हेंबर ः महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी दिवाळीच्या काळात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय ‘ओल्ड मंक’ रमची विक्री राज्यात पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली या ब्रँडची विक्री आता नव्या लेबलसह पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बाटलीवरील माहितीमध्ये आवश्यक बदल करण्यास कंपनीने तयारी दर्शवली असून, मुंबई उच्च न्यायालयातील याचिकाही मागे घेतली आहे. त्यामुळे ओल्ड मंकच्या पुनरागमनाची तयारी सुरू झाली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने मे महिन्यात खोपोली येथील ओल्ड मंकच्या उत्पादन कारखान्याची तपासणी केली होती. या पाहणीत रम तयार करण्यासाठी न्यूट्रल स्पिरिट्स आणि रम फ्लेवरिंगचा वापर होत असल्याचे आढळले. त्यामुळे या उत्पादनाची विक्री केवळ ‘रम’ या नावाने करता येणार नाही, असा आक्षेप प्राधिकरणाने नोंदवला होता. त्याचबरोबर बाटलीवर छापण्यात आलेले ‘7 इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ हे वर्णनही दिशाभूल करणारे असल्याचे सांगण्यात आले. कारण संबंधित मद्य लाकडी पिंपांमध्ये सात वर्षे मुरवलेले नसल्याचे प्राधिकरणाच्या तपासणीत स्पष्ट झाले होते.एफएसएसएआयच्या नियमानुसार मद्याला विशिष्ट चव देण्यासाठी ठरवून दिलेल्या तांत्रिक निकषांनुसारच घटकांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, ओल्ड मंकच्या उत्पादनात बाहेरून कृत्रिम फ्लेवर्स मिसळले जात असल्याचे तपासात समोर आले होते.

Back to top button