धाराशिवमध्ये भीषण आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू

लक्ष्मीपूजनाच्या रात्री राज्यात नागपूर, मुंबईसह विविध ठिकाणी अग्निकांड

मुंबई/9 नोव्हेंबर : दिवाळीच्या पहिल्यादिवशी लक्ष्मीपूजनावेळी रविवारी (8 नोव्हेंबर) राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटनांनी गालबोट लागल्याचे दिसून आले. दिवाळीच्या रात्री राज्यात अनेक शहरांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि इतर कारणांमुळे आगीच्या भीषण घटना घडल्या. मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, बीड आणि नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. समोर आलेल्या माहितीनुसार, धाराशिवमधील येडशी येथे घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (8 नोव्हेंबर) धाराशिवच्या येडशीमध्ये एका घराला आग लागल्यानंतर एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून यामध्ये एकाला वाचविण्यात यश आले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री येडशीमध्ये एका किराणा दुकानावरील मजल्यावर अचानकपणे आग लागली. यावेळी, तिथे राहत असलेले कुटुंब आगीमध्ये सापडले. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी, अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण, यावेळी 6 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले. यावेळी एकाला वाचविण्यात यश आले आहे. दिवाळीनिमित्त घरामध्ये लावलेल्या पणतीमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील डोंगरी येथील हाजी कासम चाळ परिसरातील पत्र्याची दुकाने आणि गॅरेजला भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील 30 हून अधिक झोपड्या आणि दुकाने खाक झाली. याशिवाय, जोगेश्वरी, अंधेरी, मालवणी आणि कांदिवली अशा चार ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. जोगेश्वरीतील जेव्हीएलआर परिसरात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ मोठी आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलाला ती विझवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. त्याचवेळी अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोड परिसरात लेव्हल 2 ची आग लागल्याची घटना घडली. मालवणी परिसरातही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. तर कांदिवली पश्चिम येथील कांदिवली रिक्रिएशन क्लबच्या गार्डन परिसरातही रात्री आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

Back to top button