मुंबई आयआयटी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अमरावती/6 नोव्हेंबर – मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) पवई येथे साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या खोब्रागडे गटाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. एका वर्षात 4 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची स्वतंत्र चौकशी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच विद्यार्थ्यांच्या संघटनांना मान्यता आणि साहिल वाकोडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशा 13 मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शहराध्यक्ष रामेश्वर रामटेके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. मुंबईतील आयआयटी पवई परिसरात 18 सप्टेंबर रोजी साहिल वाकोडे याने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या शैक्षणिक वातावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. या प्रकरणात संस्थेचे संचालक शिरीष केदार आणि प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, केवळ निलंबन करून प्रश्न सुटणार नाही, तर या घटनेची सखोल आणि स्वतंत्र चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. विद्यार्थ्यांवरील अन्याय, मानसिक दबाव आणि संस्थांमधील भेदभावाच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याची गरजही निवेदनातून व्यक्त करण्यात आली. गेल्या वर्षभरात 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांची स्वतंत्र चौकशी करून त्यामागील कारणे शोधावीत आणि चौकशीचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या संघटनांना अधिकृत मान्यता द्यावी आणि साहिल वाकोडे यांच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत द्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी चरणदास नंदागवळी, अ‍ॅड. दिलीप घरडे, कृष्णा ढवळे, मधुकर खोब्रागडे, डॉ. शेषराव घरडे, रमेश खांडेकर, भगवान जगभिये यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button