न्यायालय उडविण्याच्या धमकीचा तपास निर्णायक टप्प्यावर

ई-मेल पाठविणार्‍याचा सुगावा पोलिसांच्या हाती

संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना होणार

अमरावती/6 नोव्हेंबर – अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारती बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या ई-मेल प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. शहर पोलिसांच्या सायबर पथकाने तांत्रिक तपासातून ई-मेल पाठविण्याच्या संभाव्य ठिकाणाचा सुगावा मिळविला असून, त्याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडेही सोपविण्यात आला आहे. त्यामुळे धमकी देणारी व्यक्ती कोण, तिचा उद्देश काय आणि या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी वेग वाढविला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.02 वाजता ‘स्मिथ जॉन्सन 6889’ या नावाने असलेल्या ई-मेल पत्त्यावरून धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. या संदेशात दुपारी 3.11 वाजता जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारती बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती. या दोन्ही इमारतींमध्ये न्यायाधीश, वकील, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे धमकी मिळताच पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवून दोन्ही इमारतींची तपासणी केली होती. या ई-मेलचा उगम शोधण्यासाठी शहर पोलिसांचे सायबर पथक गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक माहितीची तपासणी करीत होते. ई-मेल पत्त्याशी संबंधित नोंदी आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आहे. त्यातून ई-मेल पाठविण्याचे संभाव्य ठिकाण जवळपास निश्चित करण्यात आले आहे. आता विशेष पथक संबंधित ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करणार असून, तेथील पुरावे आणि इतर माहितीची पडताळणी केली जाणार आहे. दुसरीकडे, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहशतवादविरोधी पथकानेही स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे. धमकीमागील हेतू, संभाव्य कारणे आणि संशयास्पद बाबींची चौकशी केली जात आहे. सायबर पथकाकडून ई-मेलचा माग काढला जात असताना दहशतवादविरोधी पथकाकडून संपूर्ण घटनेची अन्य बाजूंनी तपासणी केली जात आहे. संशयित व्यक्तीची ओळख पटवून धमकीमागील सत्य बाहेर आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. सायबर पथक अ‍ॅक्शन मोडवर -2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.02 वाजता धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. दुपारी 3.11 वाजता न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारती उडविण्याची धमकी देण्यात आली होती. सायबर पथकाला संभाव्य ठिकाणाचा सुगावा लागला असून, प्रत्यक्ष पडताळणीसाठी विशेष पथक सज्ज करण्यात आले आहे.

Back to top button