कडाक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत उबदार कपड्यांचा बाजार

ग्राहकांनी पाठ फिरल्याने व्यापारी चिंतेत

स्वेटर जॅकेट आणि ब्लँकेटच्या विक्रीला मंदी

अमरावती/5 नोव्हेंबर – नोव्हेंबर महिना सुरू होऊनही थंडीचा जोर वाढत नसल्याने अमरावती शहरातील उबदार कपड्यांच्या बाजारात अपेक्षित तेजी आलेली नाही. दरवर्षी दिवाळीनंतर स्वेटर, जॅकेट, टोपी, कानटोपी, चादरी आणि ब्लँकेट खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. मात्र यंदा तापमानात अपेक्षित घट न झाल्याने ग्राहक बाजाराकडे फिरकत नसून व्यापार्‍यांची विक्री मंदावली आहे. दुसरीकडे वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्याने उबदार कपड्यांच्या किमतीतही 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची घटलेली संख्या आणि वाढलेल्या किमती अशा दुहेरी संकटाचा सामना व्यापार्‍यांना करावा लागत आहे. कडाक्याची थंडी पडण्याच्या प्रतीक्षेत व्यापारी आता बसून आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही तिबेटी कपड्यांचे व्यापारी विविध शहरांत दाखल झाले असून त्यांनी उबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. अनेक व्यापारी कपड्यांची खरेदी करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या शहरांत दुकाने लावण्यासाठी कर्ज काढून भांडवल गुंतवतात. मात्र यंदा थंडीच नसल्याने त्यांची गुंतवणूक अडकली आहे. दिवाळीनंतर थंडी वाढू लागल्यावर विक्रीला वेग येतो, असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचे लक्ष आता तापमानातील घसरणीकडे लागले आहे. अमरावती शहरातील जयस्तंभ चौक, गाडगेनगर आणि राजकमल चौक परिसरात उबदार कपड्यांची दुकाने सजली आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट, टोपी आणि ब्लँकेटचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी डोरेमॉन, मिकी माऊस आणि स्पायडरमॅन यांच्या चित्रांचे स्वेटर व जॅकेट आकर्षण ठरत आहेत. मात्र ग्राहकांची वर्दळ वाढत नसल्याने व्यापार्‍यांची चिंता कायम आहे. थंडीचा जोर वाढल्यानंतरच बाजारात खर्‍या अर्थाने खरेदीला वेग येईल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत.

Back to top button