बँकेतील सोने लिलावाच्या नावाने कोट्यवधी लुटले

कोट्यवधींच्या फसवणुकीत भारसाकळे यांच्या जावयास अटक

पिंपरी चिंचवडमध्ये गाडगेनगर पोलिसांची कारवाई
दोन बँकेच्या सोन्याच्या लिलावाच्या माध्यमातून आमिष

अमरावती /3 नोव्हेंबर- दर्यापूरच्या नगराध्यक्षा मंदाताई सुधाकर भारसाकळे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुधाकरराव भारसाकळे यांचे जावई स्वप्नील उर्फ मोंटू अनिलराव भुईभार याने व्यापारी कुटुंबाला सोन्याच्या लिलावाच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 12 लाख रुपयांचा मोठा गंडा घातला असून या कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवड येथून अटक करून जेरबंद केले आहे.
अमरावतीच्या ऊर्जा कॉलनी व्हीएमव्ही परिसरात राहणारा स्वप्नील भुईभार हा तुळजाई ज्वेलर्सचा मालक म्हणून ओळखला जातो. वय 36 वर्षे. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी व्यवहार केले होते. पण त्याच्या मागे मोठी फसवणूक दडली होती. त्याची पत्नी पूजा स्वप्नील भुईभार, माहेर भारसाकळे आणि आई निशा अनिलराव भुईभार या दोघींची नावेही या गुन्ह्यात आली आहेत. तिघांनी मिळून एक पद्धतशीर कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पन्नालाल नगर येथील व्यापारी विक्रम रामगोपाल गुप्ता, वय 37 वर्षे यांनी या विरोधात थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1134/2026 दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(4), 3(5) अन्वये हा गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीत विक्रम गुप्ता यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ जयेश गुप्ता, आई शिला गुप्ता आणि पत्नी आयुषी गुप्ता यांचाही उल्लेख आहे. या चौघांकडून मोठी रक्कम आणि दागिने घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार 9 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2026 या दोन वर्षांच्या काळात हा सगळा प्रकार घडला. आरोपीने गुप्ता कुटुंबाचे 297.99 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्वतःच्या फायद्यासाठी बँकेत गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. त्या दागिन्यांची किंमत सुमारे 41 लाख 71 हजार 860 रुपये आहे. रोख रक्कम आणि दागिने मिळून एकूण 1 कोटी 12 लाख 47 हजार 60 रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलीस कागदपत्रात नमूद आहे.
या घटनेमुळे अमरावतीच्या व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष कुटुंबाशी संबंध असलेल्या व्यक्तीने असा प्रकार केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. अनेक व्यापारी आता पुढे येऊन आपल्यासोबतही असाच प्रकार झाला का हे तपासत आहेत. आरोपीने जाणूनबुजून विश्वास संपादन केला आणि नंतर पैसा हडप केल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल होताच आरोपीने शहरातून पळ काढला होता. तो पुणे परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गाडगेनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पिंपरी चिंचवड येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला अमरावतीला आणून शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलीस आता त्याची कसून चौकशी करीत आहेत. या पैशाचे काय केले, दागिने कुठे गहाण ठेवले, आणखी किती लोकांना गंडा घातला, याचा तपास सुरू आहे. न्यायालयात त्याला हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार आहे.

स्वस्त सोन्याच्या आमिषातून कोट्यवधींचा गंडा
मुथूट फिनकॉर्प आणि सीएसबी बँकेच्या सोन्याच्या लिलावातून कमी किमतीत सोने मिळवून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखवले. व्यापारी विक्रम गुप्ता, जयेश गुप्ता, शिला गुप्ता, आयुषी गुप्ता यांच्याकडून 1 कोटी 48 लाख रुपये घेतले. त्यातील काही रक्कम परत केली. उरलेली रक्कम आणि 297 ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवून मोठी फसवणूक केली. असा प्रकार उघड झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पसार जावयाला पकडण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये छापा
गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता. गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर ठाकरे, आशिष ठाकरे, अमोल यादव, निलेश जुनघरे, सिद्धार्थ शृंगारे, विनोद मालवीय यांनी पिंपरी चिंचवड येथे छापा टाकला. आरोपीला ताब्यात घेऊन अमरावतीला आणले. वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी धडक कारवाई करून मोठे यश मिळवल्याचे बोलले जात आहे असे सांगण्यात आले आहे.

Back to top button