दुष्काळाचे संकट गंभीर, बोअरिंगचा सपाटा सुरूच
शासनाचे निर्बंध धाब्यावर; अंजनगाव सुर्जी तालुक्यात खुलेआम बोरवेल खोदकाम, कारवाई करणारेचं अधिकारी गायब ?

अंजनगाव सुर्जी/4 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि नियमावली लागू केली आहे.
दुष्काळी परिस्थितीत भूजल पातळी टिकवून ठेवणे तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याने बोरवेल खोदकामावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र,अंजनगाव सुर्जी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात या निर्बंधांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे शासनाचे आदेश नेमके कुणासाठी,असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंजनगाव शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बोरवेल खोदकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे,हे काम सुरू असतानाही संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील टाकरखेडा रोड परिसरातील देवगिरी प्लॉट एरियामध्ये बांधकामासाठी बोरवेल खोदण्यात आली.मात्र,या ठिकाणी संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी कारवाईसाठी पोहोचल्याचे दिसून आले नाही. दुसरीकडे,मलकापूर येथील एका शेतात रस्त्यालगत बोरवेल खोदकाम सुरू असतानाही अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे भूजल पातळीवर परिणाम करणारे बोरवेल खोदकाम सुरू असल्याचे चित्र चिंताजनक आहे.भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होऊ नये,यासाठी शासनाकडून निर्बंध लागू केले जातात.मात्र, प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी होत नसेल,तर अशा निर्बंधांचा उपयोग काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाचे आदेश असतानाही तालुक्यात खुलेआम बोरवेल खोदकाम सुरू राहणे ही बाब केवळ नियमभंगापुरती मर्यादित नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करणारी आहे
.संबंधित विभागाला या प्रकाराची माहिती नाही की माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,असा सवाल आता उपस्थित होत आहे. दुष्काळाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा,असे आवाहन केले जात असताना दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून बोरवेल खोदकाम होत असेल,तर प्रशासनाचा वचक नेमका कुठे आहे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी
अंजनगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या बोरवेल खोदकामाची वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करावी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.तसेच या प्रकारांकडे दुर्लक्ष करणार्या किंवा कर्तव्यात कसूर करणार्या संबंधित अधिकार्यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांना जाब विचारावा.अन्यथा दुष्काळी परिस्थितीत भूजलसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी शासनाने लागू केलेले निर्बंध केवळ कागदावरच राहतील,अशी भीती व्यक्त केली जात आहे.





