अमरावतीत 400 कार 2900 दुचाकींची डिलिव्हरी होणार

कार बाजारातही सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना पसंती

विक्रीवर दुष्काळाचा 10 ते 15 टक्के परिणाम होण्याची शक्यता

अमरावती / 4 नोव्हेंबर : धनत्रयोदशी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी वाहन खरेदीसाठी ग्राहकांमध्ये विशेष उत्साह असतो. यंदाही अमरावतीच्या वाहन बाजारात चांगली ग्राहकवर्दळ राहण्याची अपेक्षा वाहन विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरात 400 हून अधिक चारचाकी, तर सुमारे 2900 दुचाकी वाहनांची डिलिव्हरी होण्याचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे वाहन विक्रीवर 10 ते 15 टक्के परिणाम होण्याची शक्यता असली, तरी ग्राहकांचा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी आधीपासूनच बुकिंग केले आहे. रविवारीही अनेक ग्राहकांनी बुकिंग केले असून, त्यांना शुक्रवारी वाहनांची डिलिव्हरी दिली जाणार आहे. अमरावती शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सर्व प्रमुख कंपन्यांचे एकापेक्षा अधिक डीलर्स आहेत. ग्राहकांना वेळेत वाहन उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांनी आवश्यक तयारी केली आहे. वाहनांची कागदपत्रे, आरटीओ नोंदणी आणि इतर प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या आहेत.

मारुती सुझुकीच्या 80 हून अधिक गाड्यांचे बुकिंग

मारुती सुझुकीच्या एरिना आणि नेक्सा या दोन्ही शोरूमचे संचालक रणजित बंड यांनी सांगितले की, वाहनांच्या बुकिंग मध्ये हळूहळू वाढ होत आहे. सर्व मॉडेल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दसर्‍याच्या काळात अनेक मॉडेल्सचा साठा संपल्याने कंपनीकडून नवीन वाहने मागविण्यात आली आहेत. अमरावतीतील एरिना शोरूममध्ये आतापर्यंत 50 वाहनांचे बुकिंग झाले असून, नेक्सा शोरूममधून अमरावती आणि वाशिम मिळून 30 हून अधिक वाहनांची धनत्रयोदशीला डिलिव्हरी होणार आहे. आगामी दिवसांत बुकिंगमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

सीएनजी वाहनांना वाढती मागणी

जीपीएस किया कंपनीचे संचालक श्रवण पवन गट्टाणी यांनी सांगितले की, दुष्काळाचा काही प्रमाणात परिणाम जाणवत असला, तरी वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह कायम आहे. सीएनजी वाहनांची मागणी वाढत असून, त्यांच्या शोरूममधून किया कंपनीच्या सात आसनी सीएनजी प्रकारातील 12 ते 13 गाड्यांची धनत्रयोदशीला डिलिव्हरी होणार आहे. या वाहनाची किंमत सुमारे 11.50 लाख रुपये आहे. याशिवाय इलेक्ट्रिक आणि इतर मॉडेल्सनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. शेकडो नवीन चारचाकी वाहने शहरातील रस्त्यांवर दाखल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

टोयोटा हायरायडरच्या काळ्या रंगाला पसंती

मुरली टोयोटाचे संचालक मोहन कलंत्री यांनी सांगितले की, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन कार खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. त्यांच्या शोरूममध्ये अनेक मॉडेल्सचे बुकिंग झाले आहे. विशेषतः टोयोटा हायरायडरच्या काळ्या रंगाच्या मॉडेलला अधिक मागणी आहे. धनत्रयोदशीला सुमारे 15 ते 16 वाहनांची डिलिव्हरी होणार असून, ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button