निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी 2 कोटींची लाच मागितली?

केरळ सरकारकडून चौकशीचे आदेश

नवी दिल्ली/4 नोव्हेंबर ;  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाने दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी ब्युरोला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी 2006 मध्ये केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असताना, सरकारी बांधकाम प्रकल्पांची बिले मंजूर करण्यासाठी कंत्राटदारांकडून 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांच्या कार्यालयाने बुधवारी सांगितले की, ही चौकशी कंत्राटदार साजन यांच्या तक्रारीच्या आधारे केली जाईल. साजन यांनी आरोप केला आहे की, भारत-मलेशिया संयुक्त उपक्रम असलेल्या ‘पती-बेल’ने हाती घेतलेल्या एका रस्ते प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक, मलेशियन अभियंता ली सी बीन यांच्याकडे ज्ञानेश कुमार यांनी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. ली यांनी नोव्हेंबर 2005 मध्ये मलेशियात आत्महत्या केली. त्यांनी एक सुसाईड नोट मागे ठेवली होती, ज्यात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर लाच मागितल्याचा आणि परिणामी प्रकल्पाचे पैसे रोखून ठेवल्याचा आरोप केला होता.

Back to top button