महाराष्ट्र पोलीस दलात 16 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या

नागपूरच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी चेतना तिडकेंकडे

मुंबई/3 नोव्हेंबर-महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस आणि आरपीएस अधिकार्‍यांच्या पदस्थापनांमध्ये गृह विभागाने महत्त्वाचे बदल केले आहेत. 2 नोव्हेंबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनंतर 16 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. याच निर्णयात ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना त्यांच्या सध्याच्या पदावर आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिवराज पाटील यांचा समावेश आहे. या मुदतवाढीमुळे तिन्ही अधिकार्‍यांना त्यांची सध्याची जबाबदारी पुढील वर्षभर सांभाळता येणार आहे.
बदल्यांच्या आदेशानुसार, ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे शहर परिमंडळ क्रमांक 1 च्या पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आकांक्षा यादव यांची रत्नागिरीहून लातूर जिल्ह्यातील औसा येथे, तर प्रतीक्षाधीन संदीप जाधव यांची नांदेडमधील औसा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैशाली ईश्वर कडुकर यांची सातार्‍याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावरून पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्याकडे नागपूर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षक (अभियान) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाणे शहरातील सूरज गुरव यांची नांदेडच्या अपर पोलीस अधीक्षकपदी, तर प्रतीक्षाधीन नरसिंग यादव यांची सातार्‍याच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे ठाणे येथील नागरी हक्क संरक्षण विभागाची जबाबदारीही नमूद करण्यात आली आहे.स्थानिक याशिवाय धनंजय अनंत जाधव यांची पिंपरी-चिंचवड येथील सहायक पोलीस आयुक्त पदावरून सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

Back to top button