जिल्हा बँकांच्या तिजोरीवर महायुतीचे वर्चस्व
अहिल्यानगरमध्ये निलेश लंके पुरून उरले

सातारा /3 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून सातारा, सांगली आणि अहमदनगर या तीन ठिकाणी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालावर अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर याचे निकाल मंगळवारी (3 नोव्हेंबर) समोर आले असून अनेक धक्कदायक परिणाम समोर आले आहेत. या जिल्हा बँकांच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी मात्र, काही जागांसाठी मतदान पार पडले. या निकालावर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशामध्ये सकाळी मतमोजणीला सुरुवात झालेली असताना पहिल्या एक ते दीड तासांमध्येच अनेक मोठे निकाल समोर आले. विशेष म्हणजे अनेक जिल्हा बँकांच्या निकालावर महायुतीने वर्चस्व मिळवल्याचे समोर आले आहे.
सर्वात पहिल्यांदा सातारा जिल्हा बँकेचे निकाल समोर आला. यावेळी, तब्बल 42 वर्षांनी जिल्हा बँकेत पुन्हा एकदा देसाई गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पाटण सोसायटी गटातून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे नेते आणि विद्यमान संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.
फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. दरम्यान, कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील मोरे आणि भाजपचे सुनील खत्री यांच्यामध्ये टाय झाल्याचे समोर आले आहे. मतमोजणीदरम्यान एक चिठ्ठी फाटलेली आढळल्याने आणि एक मतपत्रिका बाद ठरवण्यात आल्याने हा संपूर्ण तिढा आणखी वाढला. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे आता या जागेचा निकाल ईश्वर चिठ्ठीच्या (लॉटरी) माध्यमातून होणार आहे.
सांगली जिल्हा बँकेत संजयकाका पाटील ’किंगमेकर’?-सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागताच सत्तास्थापनेच्या गणितात मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकूण 21 जागांपैकी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांना प्रत्येकी 10-10 जागा मिळाल्याने जिल्हा बँकेत सत्तेचा पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.तासगावमधून अपक्ष म्हणून विजयी झालेले माजी खासदार संजयकाका पाटील ’किंगमेकर’च्या भूमिकेत आले असून बँकेचा नवा अध्यक्ष कोण होणार, याचा फैसला पूर्णपणे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.





