पीएसआय अधिकार्याचा हृदयविकाराने मृत्यू
शासकीय निवासस्थानी अचानक प्रकृती बिघडली

एसआरपीएफ चंद्रकांत काळे यांनी घेतला अखेरचा श्वास
अमरावती / 3 नोव्हेंबर – राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत काळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते अवघ्या 41 वर्षांचे होते. अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या शासकीय निवासस्थानी सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कर्तव्यावर असलेल्या एका तरुण आणि अनुभवी पोलीस अधिकार्याच्या अचानक जाण्याने पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.
चंद्रकांत काळे हे राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 18 मध्ये काटोल येथे कार्यरत होते. सध्या ते अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या शासकीय निवासस्थानी राहत होते. मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजताच्या दरम्यान त्यांच्या छातीत अचानक त्रास सुरू झाला. प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
काळे हे मे 2023 मध्ये अमरावती येथे आले होते. पोलीस दलात कर्तव्य बजावताना त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या चंद्रकांत काळे यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 41 व्या वर्षी त्यांची जीवनयात्रा संपल्याने नातेवाईक आणि परिचितांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्य राखीव पोलीस दलासह पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. सहकारी आणि मित्रपरिवाराने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एका तरुण, कर्तव्यदक्ष अधिकार्याच्या अचानक झालेल्या निधनाने पोलीस दलाने आपला सहकारी गमावला आहे.





