शेतकर्‍यांनो काळजी करू नका, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी

पंतप्रधान मोदींचे मराठीत भाषण; मदतीचे दिले आश्वासन

पुण्यात मेट्रोचा लोकार्पण सोहळा उत्साहात

पुणे /3 नोव्हेंबर  : ‘महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मला माहिती आहे. राज्य सरकारने आगाऊ मदत दिली आहे. मी ‘पीएम किसान’चा निधी दिला. शेतकर्‍यांनो काळजी करू नका,’ अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. दुष्काळातून सावरण्यासाठी महाराष्ट्राला येत्या काळात मदत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषण करत मराठीजनांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. ‘दिवाळी जवळ आली आहे. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा,’ असा खास संदेश देत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव शर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आदी या वेळी उपस्थित होते. ‘फडणवीसांच्या नेतृत्वात जलसंधारणाची अनेक कामे झाली. मात्र, पर्यावरणाचे संकट मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडूनही मदत करण्यात येईल,’ अशी टिप्पणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ‘सणासुदीचा काळ आहे. आपल्या भाऊबंधांच्या अडीअडचणी आपण प्रत्येकाने समजून घ्यायला हव्यात. सण साजरा करत असताना दुष्काळाच्या सावता अडकलेल्या आपल्या बांधवांचा विचार करायला हवा,’ असे आवाहनही त्यांनी देशवासीयांना केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणार्‍या नोकरदारांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत होते. या सगळ्यांच्या नजरा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याकडे लागले होत्या. आता पंतप्रधानांच्या हस्ते या मार्गिकेचे लोकार्पण होत आहे, हा सगळ्यांसाठी मोठ्या आनंदाचा क्षण आहे.’
‘देशातील सगळ्यात मोठे मेट्रोचे जाळे महाराष्ट्रात विकसित करण्यात येत आहे. राज्यातील 12 महानगरांमध्ये मेट्रोची कामे सुरू आहेत. मेट्रोमुळे या शहरांमधील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे,’ असेही फडणवीस म्हणाले. ‘समाजातील शेवटच्या माणसाला नजरेसमोर ठेवून देशात विकास होत आहे. एकीकडे डोळे दिपतील असे पूल, रेल्वे मार्ग, मेट्रो, उड्डाणपुल उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर गरिबी निर्मूलनाचे कामही हाती घेण्यात आले. परिणामी देशातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली,’ असेही त्यांनी सांगितले

Back to top button