14 कोटींच्या सायबर अपहार; व्यापार्‍याला अटक

36 बँक खात्यांत रक्कम, दोघांचा शोध सुरू

मुंबई /2 नोव्हेंबर: सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्ह बँकेकडील निपटारा खात्यातून 13 कोटी 96 लाख रुपयांची रक्कम 187 अनधिकृत व्यवहारांद्वारे वळविण्यात आल्याच्या सायबर अपहारप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कांदिवलीतील कपड्यांच्या व्यापार्‍याला अटक केली आहे. मेहुल सीमारिया (49) असे अटक करण्यात आलेल्या व्यापार्‍याचे नाव असून, त्याच्या कंपनीच्या खात्यात अपहारातील सुमारे एक कोटी रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या रकमेतून त्याने आभासी चलन खरेदी केल्याचा पोलिसांना संशय असून, पैशांचा पुढील मागोवा घेण्यात येत आहे. सीमारिया हा ‘दर्शन ड्रेसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीच्या खासगी बँकेतील खार शाखेच्या खात्यात अपहारातील सुमारे एक कोटी रुपये जमा झाले होते. संबंधित व्यवहारांबाबत चौकशी केली असता सीमारिया समाधानकारक माहिती देऊ शकला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या रकमेतून आभासी चलन खरेदी करण्यात आले का, तसेच ती परदेशातील खात्यांमध्ये वळविण्यात आली आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात गोरेगाव येथील विष्णू राठी आणि कांदिवलीतील वरुणराज नरकर या आणखी दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. या व्यवहारांमध्ये बँकेच्या आर्थिक संदेशवहन प्रणालीशी संबंधित सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करण्यात आल्याचा संशय आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकी असलेल्या इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (आयएफटीएएस) या संस्थेच्या केंद्रीय एसएफ एमएस सर्व्हरपर्यंत बँकेच्या प्रणाली मार्फत अनधिकृत प्रवेश मिळवून व्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एसएफएमएस ही बँकांदरम्यान आर्थिक व्यवहारांचे संदेश पाठविण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली आहे. या प्रणालीतील कथित गैरवापरामुळे बँकेच्या निपटारा खात्यातून रक्कम वळविण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या अंतर्गत नोंदींमध्ये या 187 व्यवहारांचा तपशील आढळला नव्हता.व्यवहारांचा तपशील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनुसार, 15 ते 17 ऑक्टोबरदरम्यान बँकेच्या रिझर्व्ह बँकेकडील निपटारा खात्यातून 187 अनधिकृत व्यवहार झाले. या व्यवहारांद्वारे एकूण 13 कोटी 96 लाख रुपये 36 वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमध्ये वळविण्यात आले.

Back to top button