शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 16 वा पदवीदान सोहळा उत्साहात

430 विद्यार्थ्यांना पदवी, तर 24 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान

अमरावती /2 नोव्हेंबर: अमरावती : तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच जल, ऊर्जा आणि अन्नासारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून ’विकसित भारत 2047’ चे खंदे शिलेदार बना, असे प्रतिपादन नागपूरच्या व्हीएनआयटीचे संचालक प्रा. डॉ. प्रेम लाल पटेल यांनी केले. शेगाव नाका येथील अभियंता भवनात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 16 वा पदवीदान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात 430 विद्यार्थ्यांना पदवी, तर 24 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी बहाल करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आशिष एम. महल्ले होते, तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रेम लाल पटेल पुढे म्हणाले की, अर्थशास्त्र, नैतिकता आणि कार्यक्षमता हेच आपल्या व्यावसायिक जीवनाचे ब्रीदवाक्य बनवले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम मिशन आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करतानाच कचर्‍यापासून सर्वोत्तम निर्मिती करून वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देणे काळाची गरज आहे. प्राचार्य प्रा. डॉ. आशिष एम. महल्ले यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करताना 60 वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाची स्वायत्तता 2029-2030 पर्यंत वाढवली असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत 15 मायनर प्रोग्राम्स आणि 7 ऑनर्स कोर्सेस सुरू केले आहेत. 2025-26 या शैक्षणिक वर्षात 150 हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला असून 244 विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. एनव्हिडिया ग्राफिक्स कंपनीकडून विद्यार्थ्याला सर्वाधिक 26.5 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. पदवी अभ्यासक्रमात मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेत शुभम छगन पाटील (9.68 सीजीपीए), माहिती तंत्रज्ञान शाखेत प्रेम प्रमोद सातपुते (9.46 सीजीपीए), सिव्हिल अभियांत्रिकी शाखेत शिवम ज्ञानेश्वर यवतकर (9.43 सीजीपीए), संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेत प्रणाली अरुणराव गुल्हाने (9.28 सीजीपीए), इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेत मानसी मोहन लासुणे (8.75 सीजीपीए), तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेत श्रीहरी प्रकाश उमप (8.31 सीजीपीए) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर अभ्यासक्रमात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेत ऐश्वर्या बाळभाऊ बुंदेले (9.26 सीजीपीए), इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि कम्युनिषकेशन शाखेत सायली अनिल सांगळे (9.01 सीजीपीए), तर पर्यावरण अभियांत्रिकी शाखेत शबनम निझामुद्दीन शेख (8.43 सीजीपीए) यांनी अव्वल स्थान पटकावले.सर्व सात पदवी अभ्यासक्रमांमध्ये सर्वोच्च 9.68 सीजीपीए मिळवल्याबद्दल मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी शुभम छगन पाटील याला विशेष सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व महिला विद्यार्थिनींमध्ये प्रथम आलेल्या संगणक विज्ञान विभागाच्या प्रणाली अरुणराव गुल्हाने हिला 5 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. पी. बेडकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. एम. एस. मोरे यांनी, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. के. एस. वासणकर यांनी जबाबदारी सांभाळली. शेवटी डॉ. के. एन. तायदे यांनी मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि वृत्तपत्र प्रतिनिधींचे आभार मानले.

Back to top button