कर्ज पुनर्वित्त मोहिमेत अमरावती जिल्हा राज्यात प्रथम
कृषी कर्जवाटपातही अव्वल

पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते बँक अधिकार्यांचा सत्कार
अमरावती/2 नोव्हेंबर : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कर्ज पुनर्वित्त मोहिमेत अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे तसेच बँकांच्या समन्वित सहभागामुळे जिल्ह्याच्या कर्ज पुनर्वित्त मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्याची कर्ज पुनर्वित्ताची प्रगती केवळ 8 टक्के होती. ती ऑक्टोबरअखेर 55 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय असून, बुलढाणा जिल्ह्यात 33 टक्के, धुळे व अकोला जिल्ह्यांत प्रत्येकी 31 टक्के, यवतमाळ जिल्ह्यात 21 टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 18 टक्के, तर जालना जिल्ह्यात 14 टक्के कर्ज पुनर्वित्ताची नोंद झाली आहे.कृषी कर्जवाटपाच्या बाबतीतही अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला
आहे. जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टाच्या 81 टक्के कृषी कर्जवाटप पूर्ण केले असून, राज्याची सरासरी 52 टक्के आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्याने अग्रस्थान प्राप्त केले आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी बँक प्रतिनिधी व संबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन कर्ज पुनर्वित्त आणि पीक कर्जवाटपाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक निर्देश, बँकनिहाय कामगिरीचा पाठपुरावा आणि प्रशासकीय समन्वय यांवर विशेष भर देण्यात आला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोहिमेला गती मिळून जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या पाच बँकांचा गौरव करण्यात आला. तसेच, उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेल्या शाखा व्यवस्थापकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भंडारज शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. महेंद्र सपकाळ, बँक ऑफ महाराष्ट्र, लोणी टाकळी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. प्रफुल्ल शेंडे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, अंजनगाव सुर्जी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. सचिन कासबे यांचा समावेश आहे.





