अमरावती जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

ई-मेल मिळताच न्यायालयाची इमारत रिकामी

पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
पाच मजली इमारतीची बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी

अमरावती /2 नोव्हेंबर – अमरावती जिल्हा न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी दुपारी न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी आलेल्या या संदेशात दुपारी 3.11 वाजता स्फोट घडविण्याचा इशारा देण्यात आला होता. धमकीची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत संपूर्ण न्यायालयाची इमारत रिकामी केली. न्यायाधीशांची दालने, कार्यालये आणि इतर विभागांमधील कामकाज थांबविण्यात आले. वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि विशेष कृती दलाच्या जवानांनी पाच मजली इमारतीची तपासणी सुरू केली. अग्निशमन दलालाही सज्ज ठेवण्यात आले होते.चार मजल्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पाचव्या मजल्यावरही शोधमोहीम राबविण्यात आली. न्यायालयातील प्रत्येक विभाग आणि परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, वृत्त लिहिपर्यंत कोणतीही स्फोटक वस्तू अथवा संशयास्पद साहित्य आढळले नव्हते. दरम्यान, धमकीच्या ई-मेलमध्ये रात्री 9.11 वाजता रेल्वे स्थानकांवर स्फोट घडविण्याचा इशाराही देण्यात आला होता. तसेच 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमादरम्यान स्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली होती. हा ई-मेल स्मिथ जॉन्सन6889 या नावाने पाठविण्यात आला असून, त्यात खलिस्तान समर्थक घोषणा, 1984 मधील घटनांचा उल्लेख आणि हिंसक भाषेचा वापर करण्यात आला आहे. इंजि. गुरनक सिंग (रुखन शाहवाला), गुरनवीर सिंग (खान राजदा), प्रा. गुरकुल सिंग (खेमकरण), प्रा. गुरुनगर सिंग तसेच बब्बर खालसा (परमार-कनाडा) या संघटनेचाही संदेशात उल्लेख आहे. महाराष्ट्र आणि मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह मजकूरही पाठविण्यात आला आहे. मात्र, ई-मेलमधील व्यक्ती आणि संघटनांचा या धमकीशी प्रत्यक्ष संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून ई-मेलचा स्रोत, पाठविणार्‍याची ओळख आणि धमकीची सत्यता तपासली जात आहे. राज्यातील इतर न्यायालयांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढविली आहे.

अमरावतीसह नऊ जिल्ह्यांतील न्यायालयांना बॉम्बची धमकी

न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना बाहेर काढून न्यायालयांच्या इमारतींची तपासणी
बॉम्बशोधक पथके तैनात; धमकीचे संदेश पाठवणार्‍याचा शोध सुरू

मुंबई : महाराष्ट्रातील 9 जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे संदेश सोमवारी मिळाल्याने राज्यातील न्यायालयीन आणि पोलीस यंत्रणेत मोठी धावपळ उडाली. अमरावती, सातारा, ठाणे, सोलापूर, सांगली, बीड, रत्नागिरी, परभणी आणि हिंगोली येथील न्यायालयांना धमकीचे संदेश पाठवण्यात आले. काही संदेशांमध्ये दुपारी 3.11 वाजता स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला होता. खबर मिळताच सर्व संबंधित न्यायालयांमधील कामकाज थांबवून न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथके, श्वानपथक आणि विशेष पथकांच्या मदतीने इमारतींची तपासणी सुरू केली. दरम्यान, धमकीचे संदेश पाठवणार्‍याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास हाती घेतला आहे. सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाला सोमवारी सकाळी सर्वप्रथम धमकीचा संदेश मिळाला. त्यानंतर अन्य जिल्ह्यांतील न्यायालयांनाही असेच संदेश प्राप्त झाले. ठाणे न्यायालयाला सकाळी 9.43 वाजता आलेल्या संदेशात दुपारी 3.11 वाजता स्फोट घडवण्याचा इशारा होता. हा संदेश पंजाबी भाषेत पाठवण्यात आला होता. खबर मिळताच पोलिसांनी न्यायालयाच्या दोन्ही इमारती रिकाम्या करून परिसराची तपासणी सुरू केली. नागरिकांना सुमारे 100 मीटर दूर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. इमारतींचे सर्व 8 मजले, वाहनतळ, उपाहारगृह आणि परिसराची तपासणी करण्यात आली. अमरावती जिल्हा न्यायालयाला दुपारी 12.02 वाजता धमकीचा संदेश मिळाला. त्यातही दुपारी 3.11 वाजता स्फोट घडवण्याचा उल्लेख होता. पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयाची इमारत रिकामी करून बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि विशेष पथकांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. सांगली, सोलापूर आणि बीड येथील न्यायालयांनाही धमकीचे संदेश मिळाल्याने तेथील परिसर रिकामा करण्यात आला. परभणी, हिंगोली आणि रत्नागिरी येथेही पोलिसांनी सुरक्षा वाढवून तपासणी केली. दरम्यान, ठाणे न्यायालयाला मिळालेल्या संदेशात रात्री 9.11 वाजता महानगर रेल्वे स्थानकांवर स्फोट घडवण्याचाही उल्लेख होता. तसेच 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. संदेशात 1984 मधील घटनांचा उल्लेख आणि आक्षेपार्ह मजकूर असल्याची माहिती आहे. सायबर पोलीस संदेशांचा उगम आणि सत्यता तपासत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
धमकीच्या संदेशांमागील व्यक्तीचा शोध सुरू-राज्यातील विविध न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे संदेश मिळाल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवण्यासाठी वापरलेली संगणकीय यंत्रणा, पाठवणार्‍याची ओळख आणि संदेशांचा नेमका उद्देश शोधण्याचे काम सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत न्यायालयीन परिसरातील सुरक्षा कायम ठेवण्यात येणार आहे. धमकी खरी की केवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Back to top button