साबा कंत्राटदारांना महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत संधी
वेळखाऊ नोंदणी रद्द होताच दिलासा

शहरातील विकासकामांना मिळणार चालना
अमरावती /1 नोव्हेंबर– स्थानिक महापालिकेत काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांना आता नव्याने नोंदणी करावी लागणार नसून त्यांना थेट निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील खराटे यांच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले आणि महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी तातडीने परिपत्रक काढून कंत्राटदारांना मोठा दिलासा दिला.
महापालिकेत शहर विकासाच्या कामांसाठी कंत्राटदारांना पालिका स्तरावर वेगळी नोंदणी करावी लागत होती. सार्वजनिक बांधकाम विभागात आधीच अधिकृत नोंदणी असताना पुन्हा पालिकेत नोंदणीची कटकट कंत्राटदारांच्या मागे लागली होती. यामुळे त्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया जात होता.
हा त्रास कायमचा संपवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील खराटे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर कंत्राटदारांची ही अडचण थेट मांडली. यावर पालकमंत्री बावनकुळे यांनी तातडीने नोंदणीची दुहेरी पद्धत बंद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानंतर खराटे यांनी आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. पालकमंत्र्यांचा आदेश आणि पाठपुराव्याची दखल घेत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी अधिकृत आदेश जारी केले. या निर्णयामुळे कंत्राटदारांना केवळ आवश्यक कागदपत्रे आणि कर भरून पालिकेच्या सर्व निविदांमध्ये उतरता येईल. परिणामी शहरातील विकासकामे वेगाने मार्गी लागतील.





