दसर्यापूर्वीच गावोगावच्या दवाखान्यांना कुलूप
नेमके बंगाली डॉक्टर जातात तरी कुठे?

चिंचोली गवळी /1 नोव्हेंबर – मोर्शी तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागात गावोगावी बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. जवळपास प्रत्येक गावात हे डॉक्टर आपले दवाखाने थाटून वर्षभर रुग्णांवर उपचार करताना दिसतात. मात्र, दसर्याच्या अगोदर अचानक हे डॉक्टर गावातून गायब होतात आणि दिवाळीनंतर पुन्हा आपल्या दवाखान्यांमध्ये हजर होतात. त्यामुळे नेमके हे बंगाली डॉक्टर दसर्यापूर्वी जातात तरी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला आहे.
वर्षभर गावोगावी राहून विविध आजारांवर उपचार करणारे हे डॉक्टर अचानक महिनाभरासाठी परिसर सोडतात. त्यांच्या जाण्याचे नेमके कारण काय, ते कुठे जातात, त्यांची ही पद्धत ठरलेली कशी आणि पुन्हा दिवाळीनंतर ते गावात कसे परततात, याबाबत सामान्य नागरिकांना कोणतीही ठोस माहिती नाही. विशेष म्हणजे त्यांच्या दवाखान्यात उपचार घेणार्या रुग्णांनाही याबाबत फारशी कल्पना नसते.या डॉक्टरांच्या उपचार पद्धती, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय परवान्यांबाबत यापूर्वीही अनेकदा चर्चा झाल्या आहेत. शासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी कारवाया होत असल्याचे सांगितले जाते. तरीदेखील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अशा प्रकारचे दवाखाने सुरू असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी आवश्यक वैद्यकीय पात्रता व परवान्यांविषयीही प्रश्न उपस्थित केले जातात. दरम्यान, दसर्याच्या अगोदर हे डॉक्टर अचानक गायब होण्यामागे त्यांच्या समाजातील एखादी परंपरा किंवा विशिष्ट कार्यक्रम असल्याच्या चर्चाही नागरिकांमध्ये रंगतात. काही नागरिकांकडून हल्यांच्या टकरी आणि त्यासंदर्भातील बळीच्या प्रथेबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. मात्र, या चर्चांना कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत दुजोरा नसल्याने त्याबाबत सत्यता सांगता येत नाही. एकीकडे ग्रामीण भागातील नागरिक स्वस्त उपचारांच्या अपेक्षेने अशा दवाखान्यांकडे वळतात, तर दुसरीकडे उपचार करणार्या व्यक्तींची पात्रता, औषधांची गुणवत्ता आणि उपचारांची सुरक्षितता याबाबत प्रश्न कायम आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या दवाखान्यांची तपासणी करून डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी आणि उपचार पद्धतीची माहिती सार्वजनिक करणे गरजेचे आहे. नेमके हे डॉक्टर वर्षभर कुठून येतात, दसर्यापूर्वी कुठे जातात आणि दिवाळीनंतर पुन्हा कसे परततात? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली आहे. केवळ चर्चेपुरता हा विषय मर्यादित न राहता आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कारण नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय असून, कोणताही अनधिकृत किंवा अपात्र व्यक्ती उपचार करत असल्यास त्यावर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे





