नागपुरात 12 सराफांना जीवे मारण्याची धमकी
लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून एका पाठोपाठ धमकीचे पत्र

सराफा व्यावसायिकांना दहा लाखांच्या खंडणीची मागणी
नागपूर/1 नोव्हेंबर : चित्रपट अभिनेता सलमान खाननंतर टायगर श्रॉफ वर गोळीबार करणार्या कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने शहरातील 12 सराफा व्यावसायिकांना लाखोंची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सराफा व्यावसायिकांना गेल्या काही तासांच्या अंतरात एका पाठोपाठ एक टपालाद्वारे मिळालेल्या या धमकीच्या पत्रानंतर रविवारी हा प्रकार उघडकीस आला. एन दिवाळीच्या तोंडावर मिळालेल्या या धमकीच्या पत्रामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
इतवारी येथील सराफा ओळ आणि बजाजनगरातील काही सराफा व्यावसायिकांनाही काही तासांच्या अंतरात एका मागे एक धमकीच्या आशयाचे पत्र मिळाले. वहिच्या कागदावर हस्ताक्षरात लिहिलेली ही पत्रे टपालाद्वारे सराफाव्यापार्यांना पाठवण्यात आहेत. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत धमकी देणार्याने सराफा व्यावसायिकांना दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. यात धमकी देणार्याने व्यापार्यांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. या काळात पैशांची व्यवस्था केली नाही तर आप्तेष्टांसह त्याची किंमत मोजावी लागेल, तुम्ही कलियुगातले कौरव आहात. जसा टायगर श्रॉफवर गोळीबार केला तसात तुमच्यावरही करेल. मी आतापर्यंत चार खून केले आहेत. पोलीसांना मदत मागाल तर परिणाम चांगले होणार नाहीत, अशा आशयाचा मजकूरही धमकी देणार्याने हस्ताक्षरात लिहिला आहे.
नागपूर जिल्हा सराफा व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेश रोकडे यांनी तडकाफडकी या संदर्भात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांना धमकीच्या पत्राची प्रत सादर केली. सराफा असोसिएशनने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करत सुरक्षेचीही मागणी केली.





