खड्डा बुजवला, पण समस्या कायम! कॉटन मार्केट-विलास नगर चौक मार्गाची दुरवस्था
के.एल. कॉलेजमार्गे पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा

पूर्वी डागडुजी करूनही काही दिवसांत परिस्थिती जैसे थे
वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना करावा लागतोय त्रास
अमरावती /30 ऑक्टोबर : अमरावती शहरातील कॉटन मार्केट रोडवरील विलास नगर चौकातून के.एल. कॉलेजमार्गे पंचवटीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी यापूर्वीही मोठा खड्डा पडला होता. त्यावेळी संबंधित यंत्रणेकडून तो बुजवण्यात आला होता. मात्र, काही काळानंतर पुन्हा त्याच ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब झाली असून खड्डा पूर्वीसारखाच दिसत आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी वाहने तसेच विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनांचा तोल जाण्याची शक्यता असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरू शकतो.
तात्पुरती डागडुजी करून प्रश्न सोडवण्याऐवजी संबंधित प्रशासनाने या ठिकाणाची पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे आता तरी प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.





