उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह 6 जणांचा मृत्यू

बचाव पथकांना सर्व मृतदेह सापडले

बद्रीनाथ/30 ऑक्टोबर: बद्रीनाथ धाम येथून देहरादूनला परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) जोशीमठजवळ कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सहा जणांचा मृत्यू झाला. सर्व सहा जणांचे मृतदेह बचाव पथकांना सापडले आहेत. दुर्गम भागात हा अपघात झाल्याने मृतदेह रस्त्यापर्यंत आणण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
पोलिस अधीक्षक सुरजीत सिंह पवार यांनी या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), लष्कर आणि आयटीबीपीची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. हेलिकॉप्टरमध्ये पायलट हिमांशू यांच्यासह प्रतापा, अरुण सालुंके, शंकरगौडा व्ही. जी., सुधीर के. आणि एच. एस. नागराजा हे प्रवास करत होते. सर्व प्रवासी बंगळुरू येथील असल्याची माहिती आहे. ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. शुक्रवारी दुपारी 1 वाजून 12 मिनिटांनी बदरीनाथ येथून देहरादूनमधील सहस्रधारा हेलीपॅडच्या दिशेने हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. सुमारे 15 मिनिटांनंतर हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क तुटला. त्यानंतर हेलिकॉप्टरचा शोध सुरू करण्यात आला. जोशीमठमधील चाई गावाजवळ त्याचे शेवटचे लोकेशन मिळाले होते.
अपघात झालेल्या परिसरातील काही डोंगरांवर हलकी बर्फवृष्टी सुरू होती. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. हेलिकॉप्टर डोंगरावरील खडकाला धडकून कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Back to top button