शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेतच राहणार
वरोधकांच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर

नवी दिल्ली/30 ऑक्टोबर :मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशातील जनतेची सेवा करत राहणार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान अत्यंत महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधानांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. खर्गे यांच्या या विधानाने देशभरात प्रचंड गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर, जनतेची सेवा हेच आपले एकमेव ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी म्हणाले, मला फक्त दोनच गोष्टी माहीत होत्या; एक म्हणजे जनसेवेतून राष्ट्रसेवा आणि दुसरी म्हणजे गुजरातच्या विकासातून देशाचा विकास! मात्र, हे सर्व कसे करायचे आणि पुढे कसे जायचे? हे तुम्हीच मला शिकवले. आज देशासाठी मी जे काही करू शकलो, त्या यशाचे श्रेय केवळ आणि केवळ माझ्या देशवासीयांना जाते. या प्रवासात तुम्हा सर्वांचेही मोठे योगदान आहे. यासाठी मी तुमचा जन्मभर ऋणी राहीन आणि माझ्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत मी तुमच्याच सेवेत कार्यरत राहीन. सेवा, सेवा आणि फक्त सेवा… देशवासीयांची सेवा आणि तुम्हा सर्वांची सेवा. देश संकटात पाहून त्यांना आनंद होतो. यावेळी शेतकर्यांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, शेतकरी, तरुण आणि महिला ’विकसित भारता’च्या निर्मितीसाठी अहोरात्र काम करत आहेत. मात्र काही विरोधकांना देशाची ही प्रगती सहन होत नाही. विरोधकांवर आरोप करताना मोदी म्हणाले, हे असे लोक आहेत ज्यांना देशाला अडचणीत पाहायचे असते; देश संकटात पाहून त्यांना आनंद होतो. जेव्हा संपूर्ण देश आखाती प्रदेशातील तणावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा सामना करत आहे, तेव्हा हे लोक खते आणि गॅसच्या तुटवड्याबाबत अफवा पसरवत होते. त्यांना हे केवळ मोदींची बदनामी करण्यासाठी करायचे होते
.14000 कोटींच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भिलडी येथे ’भारत बोवाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटर’ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सुमारे 14000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी ’प्रधानमंत्री किसान सम्मान निधि’ योजनेचा 24 वा हप्ताही जारी केला. या अंतर्गत पात्र शेतकर्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.





