अंजनगाव सुर्जी येथे संत रुपलालजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार

80 कोटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

अमरावती /29 ऑक्टोबर – अंजनगाव सुर्जी येथे वारकरी संप्रदायातील संत रुपलालजी महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या 80 कोटी 26 लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या स्मारकामुळे संतांच्या समाजप्रबोधनाच्या विचारांचा प्रसार होण्यासोबतच धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक वारसा जतन आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळणार आहे. मौजे जेठमलपूर येथे प्रस्तावितअसलेल्या या प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या विकास आराखड्यावर चर्चा झाली. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. बैठकीत आमदार संजय कुटे, आमदार गजानन लवटे यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खरगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव आणि ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. संत रुपलालजी महाराज यांनी संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची परंपरा पुढे नेत समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराचे कार्य केले. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरणार आहे. येथे सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, संग्रहालय, अन्नपूर्णा भवन, शहानूर भवन, दिंडी सभागृह, छात्रावास आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येणार आहे. भाविकांच्या निवासासाठी खोल्या, प्रशासकीय इमारत आणि कर्मचार्‍यांसाठी निवासाची व्यवस्थाही केली जाणार आहे. स्मारकाच्या विकास आराखड्यात शहानूर नदीवरील पूल, 2.40 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता आणि संत रुपलालजी महाराजांसह अन्य संतांच्या प्रतिमा उभारण्याचाही समावेश आहे. या सुविधांमुळे भाविकांची ये-जा सोपी होईल. तसेच धार्मिक कार्यक्रम, प्रवचने, कीर्तने आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक जागा उपलब्ध होईल. बाहेरगावाहून येणार्‍या भाविकांची संख्या वाढल्यास परिसरातील व्यावसायिकांना आणि स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Back to top button