व्यापार्‍यांच्या कमाईवर पाणी फेरू नका

काँग्रेसच्या 1 नोव्हेंबरच्या आंदोलनावरून राहुल गांधींना व्यापार्‍याचे साकडे

नवी दिल्ली/29 ऑक्टोबर   : संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करू इच्छिणार्‍या नागरिकांनी दि. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो दिल्ली रामलीला मार्च’मध्ये सहभागी व्हावे. ‘व्होट चोरी’ रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईची किंवा लाठ्यांची भीती बाळगू नका, असे आवाहन लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या या आंदोलनाला दिल्लीतील व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. सणासुदीचा काळ आहे, व्यापार्‍यांचे कमाईचे दिवस आहेत. त्यावर पाणी फिरवू नका, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.
सदर बाजार बारी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष परमजीत सिंग पम्मा यांनी सांगितले की, ’मोहब्बत की दुकान’च्या नावाखाली आमच्या दुकानांची तोडफोड करू नये, अशी मागणी संघटनेने केली. या संदर्भातील फलक घेऊन व्यापार्‍यांनी राहुल गांधींना रॅली पुढे ढकलण्याचे आवाहन केले. दिवाळी आणि इतर सणांच्या आसपासचा काळ व्यवसायासाठी महत्त्वाचा असतो. या काळात मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये येतात. मोठ्या रॅलीमुळे वाहतुकीत व्यत्यय येऊन वाहतूक कोंडी होण्याचा आणि ग्राहकांना गैरसोय होण्याचा धोका आहे. याचा व्यवसायावर थेट परिणाम होऊ शकतो, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. परमजीत सिंग पम्मा यांनी राहुल गांधींना आवाहन केले की, प्रेमाचा संदेश द्या, पण व्यापार्‍यांच्या उपजीविकेला आणि व्यवसायाला धक्का लावून नव्हे. व्यापारी वर्षभर सणांची वाट पाहतात. ग्राहकांची वर्दळ आणि वाहतूक सुरळीत असणे आवश्यक आहे. अन्यथा, बाजारात पोहोचण्यास येणार्‍या अडचणींचा व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो. व्यापारी कोणत्याही आंदोलनाला विरोध करत नाहीत. बाजारपेठा सुरळीतपणे चालाव्यातजनतेला कोणताही त्रास होऊ नये, एवढीच त्यांची इच्छा आहे. व्यापार्‍यांच्या भावना आणि सणाचे महत्त्व लक्षात घेऊन, 1 नोव्हेंबरची रॅली पुढे ढकलण्याचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी राहुल गांधींना केली आहे. दरम्यान, लोकशाहीत प्रत्येकाला आपली मते व्यक्त करण्याचा आणि कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार आहे, परंतु व्यापार्‍यांची उपजीविका, सामान्य नागरिकांची सोय आणि बाजारपेठेतील सुव्यवस्था यांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. या महत्त्वाच्या सणासुदीच्या काळात, ग्राहकांच्या येण्या-जाण्यात अडथळा निर्माण होईल आणि त्यांना आर्थिक नुकसान पोहोचेल, असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन व्यापार्‍यांनी एकमताने केले.

Back to top button