राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लाखो अनुयायांची श्रद्धांजली
देश-विदेशातील धर्मगुरुंसह गुरुदेव भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती

श्रध्दांजली दरम्यान महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प
गुरुकुंज मोझरी/30 ऑक्टोबर : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्यावतीने गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे 58 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या मौनश्रद्धांजलीच्या कार्यक्रमात राज्यातून आलेल्या लाखो गुरुदेव भाविकांनी दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना साश्रृनयनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण भारतात संत महात्म्याला शिस्तबद्धरित्या लाखो भाविक उपस्थित राहून एकाचवेळी मौनश्रद्धांजली अर्पण करण्याचा हा देशातील एकमेव कार्यक्रम असून मौन श्रद्धांजलीच्या अर्थात मानवतादिन या कार्यक्रमाच्या नियोजनाची अनेकांनी प्रशंसा केली आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण मराठी पंचगानुसार अश्विन वद्य पंचमीला (इंग्रजी पंचगानुसार शुक्रवार दि.11 ऑक्टोबर 1968 साली) सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी आजच्या दिवशी झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यांच्या विचारांचे सर्वधर्म पंथातील गुरुदेव प्रेमी व भाविक भक्त या दिवशी गुरुकुंज आश्रमात येऊन श्रद्धांजली अर्पण करितात. मागील 57 वर्षापासून हा सोहळा गुरुकुंज आश्रमात अविरतपणे होत आहे. ’मज वेडची गुरुकुंजाचे। आवडतो मज कण कण तिथला।’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे राज्याच्या विविध भागातून पालख्या दिंड्या पताकासह लाखो भाविक श्रीगुरुदेव की जय, श्रीगुरुदेव की जय, भारत माता की जय असा जयघोष करीत खंजिरी भजन व टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर करित सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या गुरुकुंज आश्रमात येतात. त्यांना मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्याची महती सांगितल्या जाते व त्यातून भाविकांना प्रेरणा व उर्जा मिळावी हा उद्देश असतो. त्या निमित्त तुकडोजी महाराजांच्या या भव्यदिव्य विश्वव्यापक कार्याची महती शब्द व सुरांच्या माध्यमातून उपस्थित लाखो जनसमुदायाला करुन दिली. सामुदायिक ध्यान व प्रार्थनेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणार्या तुकडोजी महाराज नावाच्या या मानवतेच्या महापुजार्याचे आध्यात्माचा विज्ञानाशी संयोग साधणार्या संतांचे महानिर्वाण झाले होते. तेव्हापासून त्यांच्या विचारांची व कार्याची ज्योत तेवत ठेवण्याच्या उद्देशाने आणि सत्कार्याची प्रेरणा देण्यासाठी हा मौन श्रद्धांजलीचा भावोत्कट कार्यक्रम असतो. ’गुरुदेव ऐसी हो दया, जगका अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभासे, दम्भ सारे चूर हो, अध्यात्म औ विज्ञान के संयोगसे सब हो सुखी। संयोग समतासे यही सृष्टी करे हम स्वर्ग की।’
मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी महाद्वारावरील घंटीचा गजर करण्यात आला. नंतर मुख्य मंडपात शंखनाद करण्यात आला. नंतर दुपारी 3 वाजता गुरुदेव हमारा प्यारा या अर्चना गीताने मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंतांच्या भव्यदिव्य विश्वव्यापक कार्याची माहिती शब्द सुरांच्या माध्यमातून लाखो जनसमुदायाला करुन दिल्या गेली. यामध्ये ’तुम बिन कौन है? अब नाथ तारलो’, ’हम भारत की शान है’, सच्चे सेवक बनेंगे हम’, ’जन्मोजन्मी हेची देई। विठोबाई माझे आई’ इत्यादी भजनांचा समावेश होता. सुमारे दोन तास लाखोचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक व कार्याचा त्यातून भासणार्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला होता. महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद होताच ठिक 4 वाजून 58 मिनिटांनी शिस्तबद्धरितीने लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच यावेळी हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चनअशा सर्व धर्माच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरुंकडून करण्यात आल्या. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काहीवेळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक थांबविण्यात येउन यात्रेतील दुकाने, भोंगे काही वेळाकरिता बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र निरव शांतता पसरली होती. निरव शांततेत अतिशय शिस्तबद्धतेने मौन श्रद्धांजलीचा भावपूर्ण सोहळा पार पडला.
यावेळी श्रीगुरुदेव सेवामंडळाचे संचालक मंडळ अध्यक्षा पुष्पा बोंडे, संचालक कीर्तीकुमार भांगडीया, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचार प्रमुख गोपाल कडू, श्रीगुरुदेव सेवामंडळाचे राज्यातील आजीवन, जीवन शाखा प्रमुख, सर्व प्रचारक, कार्यकर्ते तसेच खा. बळवंत वानखडे, माजी खा. नवनीत राणा, आ.राजेश वानखडे, माजी आ. यशोमतीताई ठाकुर, नाना महाराज, अॅड. सचिन देव, रामप्रियाजी, विजयादेवी, आरती वानखडे, प्रहारचे संजय देशमुख, इत्यादी धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नियोजन आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले.





