विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले मार्गदर्शन, 136 महाविद्यालयांमधील 1214 खेळाडूंचा सहभाग

अमरावती/30 ऑक्टोबर –संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग आणि बडनेरा येथील आर.डी.आय.के. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचा शानदार प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात तीन दिवस रंगणार्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
विद्यापीठाशी संलग्न पाचही जिल्ह्यांतील 136 महाविद्यालयांतून तब्बल 1214 खेळाडू या स्पर्धेत उतरले असून, खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी थेट शब्दांत मोलाचा सल्ला दिला. तरुणांनी खेळाला आयुष्यात महत्त्वाचे स्थान देऊन मैदानावर खिलाडूवृत्ती जपली पाहिजे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष गंवडे यांनी खेळाडूंसाठी सहनशीलता, ताकद आणि चपळता हीच यशाची त्रिसूत्री असल्याचे सांगत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. प्रारंभी पार्थ सावरकर, हर्ष मोहन, मुन्सिफ अली, वैभव गवई, स्वराज भोपळे आणि शामिक्षा आमझारे या गुणवंत खेळाडूंनी हातात मशाल घेऊन मैदान गाजवले आणि कुलगुरूंच्या हस्ते मुख्य क्रीडाज्योत प्रज्वलित केली. त्यानंतर डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पर्धा सुरू झाल्याची अधिकृत घोषणा केली. याप्रसंगी मैदानावर उपस्थित सर्व 1214 खेळाडूंनी आम्ही खेळ प्रामाणिकपणे व क्रीडा भावनेने खेळू आणि कधीही अमली पदार्थांचा वापर करणार नाही, अशी भक्कम शपथ घेतली. या सोहळ्याला आर.डी.आय.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. विकास टोणे, डॉ. हेमंत देशमुख आणि अॅड. उदय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी केले. तर सूत्रसंचालन निखिल डोंगरदे व ओम सिंग राजपूत यांनी समर्थपणे सांभाळले. सरतेशेवटी ड. उदय देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रशांत शिंगवेकर, डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अतुल बिजवे, डॉ. विजय निमकर, सविता बावंथडे, डॉ. सौरभ त्रिपाठी, डॉ. निलेश इंगोले आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.





