कारागृहाच्या सुरक्षेत मोठे बदल
मुंबई महामार्गाकडील बाजूला भिंत उभारणार

मुख्य प्रवेशद्वारासह कार्यालयाचेही स्थलांतर
पोलीस अधिकार्यांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी
अमरावती/30 ऑक्टोबर – जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून, कारागृहाच्या मुंबई महामार्गाकडील बाजूला आता बाहेरील हालचाली दिसू नयेत यासाठी भिंत उभारली जाणार आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच नवीन प्रवेशद्वार आणि कारागृहाचे स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात येणार आहे. याशिवाय कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी पोलीस अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला.
कारागृहाच्या मासिक सुरक्षा तपासणीसाठी पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि विशेष कृती दलाच्या पथकाने कारागृहाला भेट दिली. यावेळी कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी आणि अन्य अधिकार्यांसोबत त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. कारागृहातील सुरक्षेतील त्रुटी, कैद्यांच्या हालचाली आणि कर्मचार्यांच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. महामार्गावरून कारागृहाच्या आतील भागात थेट नजर जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे या बाजूला भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पत्र्याऐवजी मजबूत भिंत उभारली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे बाहेरून कारागृहातील हालचाली पाहणे शक्य होणार नाही. यापूर्वी महामार्गावरून चेंडूत लपवून अमली पदार्थ तसेच भ्रमणध्वनी संच आत फेकण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यामुळे या भागातील सुरक्षा अधिक कडक केली जाणार आहे. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नवीन प्रवेशद्वार उभारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी नवीन कार्यालयाची व्यवस्था केली जाणार आहे. पाहणीदरम्यान पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि प्रांजली सोनवणे यांनी अधिकारी व कर्मचार्यांशी थेट संवाद साधला. कारागृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बदल आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.





