मालवीय चौकात भररस्त्यात सापाचे दर्शन

सर्पमित्राच्या तत्परतेने सापाला जीवदान

अमरावती/30 ऑक्टोबर – शहरातील वर्दळीच्या मालवीय चौकात शुक्रवारी दुपारी अचानक साप रस्त्यावर आल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. भरधाव वाहनांची सतत ये-जा सुरू असताना हा साप थेट रस्ता ओलांडताना दिसला. अचानक समोर आलेला साप पाहून वाहनचालकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. काही वेळासाठी चौकात कुतूहल आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र, घटनेची माहिती मिळताच एका सर्पमित्र तरुणाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतुकीची मोठी वर्दळ असतानाही त्याने काळजीपूर्वक सापाला पकडून सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सर्पमित्राच्या या तत्परतेमुळे सापाचा जीव वाचला. विशेष म्हणजे, साप रस्त्याच्या मधोमध आल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. रस्ता ओलांडताना सापाला वाहनांची धडक बसण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत सर्पमित्राने दाखविलेली सतर्कता महत्त्वाची ठरली. सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याने नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. शहरातील वाढती वाहतूक आणि मानवी वस्तीमुळे अनेकदा साप रस्त्यावर किंवा वस्तीत आढळतात. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता सापाला मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती देऊन सापाला सुरक्षितपणे बाहेर काढावे, असे आवाहनही या घटनेतून पुढे येत आहे.

Back to top button