दुष्काळात एक रुपयाही भरू नका

आ. बच्चू कडूंनी घराचे फायनान्स कंपनीचे कुलूप तोडले

कुटुंबीयांना पुन्हा घरात मिळवून दिला प्रवेश

यवतमाळ /1 नोव्हेंबर : दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटात असताना कर्जवसुलीसाठी घरांना कुलूप लावण्याच्या फायनान्स कंपन्यांच्या कारवाईविरोधात शिवसेनेचे विदर्भ नेते, आमदार बच्चू कडू आक्रमक भूमिका घेतली. आज रविवारी आर्णी तालुक्यातील देऊरवाडी (बुटले) येथे फायनान्स कंपनीने कर्जवसुलीसाठी घराला लावलेले कुलूप त्यांनी स्वतः हातोड्याने तोडले. तसेच कुटुंबीयांना पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला. सक्तीच्या वसुलीविरोधात आगामी अधिवेशनात कायदा करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
दुष्काळामुळे हाताला काम नाही, उत्पन्नाचे साधन नाही. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी घराला कुलूप लावून कुटुंबाला बेघर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. देऊरवाडी येथील रवि संजय पञे (28) यांनी तीन वर्षांपूर्वी घरबांधणीसाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कंपनीने 5 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले असले, तरी प्रत्यक्षात 2 लाख 71 हजार रुपये मिळाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यापैकी सहा ते सात हप्त्यांपोटी सुमारे 30 हजार रुपये भरल्याची माहिती रवि यांचे वडील संजय पञे यांनी दिली. यंदाच्या दुष्काळामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने पञे कुटुंबीय मजुरीसाठी पुणे येथे गेले होते. त्यामुळे गावातील घराला कुलूप होते. दरम्यान, 30 सप्टेंबर 2026 रोजी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी पोलीस बंदोबस्तात गावात आले. त्यांनी कुटुंबीयांचे कुलूप काढून कंपनीचे कुलूप लावत घर सीलबंद केल्याचा आरोप आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष नितीन चौधरी, तालुकाध्यक्ष रवि जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार बच्चू कडू यांनी फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला सामूहिक विरोध करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी फायनान्स कंपन्यांनी घरांना कुलूप लावले आहे, तेथे ती कुलूपे तोडण्याची मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सक्तीच्या वसुलीविरोधात आगामी अधिवेशनातसरकारला कायदा करण्यास भाग पाडू, असेही त्यांनी सांगितले. ‘दुष्काळात फायनान्स कंपन्यांचा एक खडकूही भरू नका!’ असे आवाहनही कडू यांनी यावेळी गावकर्‍यांना केले.

Back to top button