तुमची पंतप्रधान होण्याची वेळ कधीच येणार नाही
अमित शाह यांचा राहुल गांधींना खोचक टोला

1984 च्या शीख दंगलीचा संदर्भ देत काँग्रेसवर टीका
चंदीगड /1 नोव्हेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ रॅलीदरम्यान शाह यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधान होण्याच्या स्वप्नावर खोचक टोला लगावला. तुम्हाला जर पंतप्रधान व्हायचे असेल, तर आयुष्यभर बनावट संसदेतच राहावं लागेल; तुमची पंतप्रधान होण्याची वेळ कधीच येणार नाही, अशा शब्दांत अमित शाह यांनी राहुल गांधींना सुनावले. चंदीगढ येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
चंदीगढमधील भाषणात शाह यांनी काँग्रेसवर 1984 च्या शिख दंगलीचा संदर्भ देत निशाणा साधला. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत रॅलीचे आयोजन करणे म्हणजे 1984 च्या शिख दंगलीतील पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे, असे गृहमंत्री म्हणाले. या दंगलीत हजारो निर्दोष लोकांचा बळी गेला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील हरी नगर भागात 1984 च्या शिख दंगलीच्या विरोधात निदर्शने करत मोर्चाकाढला. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यात अनेक शिख संघटना सहभागी झाल्या होत्या.
देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मदतीशिवाय नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊच शकले नसते, असा थेट आरोप करत राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. या महामोर्चामध्ये काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील अनेक प्रमुख घटक पक्ष, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी नेते सहभागी झाले होते.’
रामलीला मैदानावरील सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता, तो या जनसागराने पोहोचवला आहे. हा केवळ एका राजकीय पक्षाचा आवाज नाही, तर देशातील तरुण, शेतकरी आणि सामान्य जनतेचा हुंकार आहे. या देशातील लोकशाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येऊ देणार नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल, तुम्ही स्वतःला खूप मोठे समजत असाल; पण लक्षात ठेवा, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही.





