अंगणवाडी सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाचे कडक निर्देश
मेळघाटातील बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या

पोषण आहार वितरणात कसूर नकोच
अमरावती /1 नोव्हेंबर – मेळघाटातील बालकांच्या पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी आणि गर्भवती मातांना मिळणार्या सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांना अधिक जबाबदारीने काम करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात नुकतीच अंगणवाडी पर्यवेक्षिकांची आढावा बैठक पार पडली, ज्यामध्ये पोषणविषयक योजनांची अंमलबजावणी, लाभांचे वितरण आणि दैनंदिन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
बैठकीत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले की, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांना नियमित प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. गावातील गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या घरी नियमित भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची तसेच पोषणाची विचारपूस करावी. शासनाकडून मिळणार्या सर्व सेवांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. पोषण ट्रॅकरमध्ये सर्व माहिती अचूक व वेळेत भरली जाईल याची गांभीर्याने दक्षता घ्यावी. नियमित आहाराचे वितरण, पोषण ट्रॅकरमधील नोंद, स्थलांतरित लाभार्थ्यांचा पाठपुरावा आणि अंगणवाडी केंद्रांतील मूलभूत सुविधांचा आढावा घेत त्यांनी सुधारणा करण्याचे आदेश दिले. अमृत आहार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के आहार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात यावा.
या आहाराबाबत बालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा यासाठी आहाराचे योग्य नियोजन, गुणवत्ता आणि नियमित वितरण याकडे विशेष लक्ष द्यावे. कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, सीएमओ फेलो डॉ. अबोली बोरसे, विस्तार अधिकारी दीपक ढवळे, सारंग काळे तसेच मेळघाटातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.





