अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ

चाहत्यांना भेटण्यासाठी बुलेटप्रूफ काचेचा वापर!

मुंबई /1 नोव्हेंबर – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची चाहत्यांशी असलेली रविवारची भेट अनेक वर्षांपासून सुरू आहे. दर रविवारी मुंबईतील जुहू परिसरातील त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर शेकडो चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. मात्र, १ नोव्हेंबरच्या रविवारी या भेटीचे स्वरूप काहीसे वेगळे पाहायला मिळाले. अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना अभिवादन केले, मात्र यावेळी ते पारदर्शक बुलेटप्रूफ काचेच्या सुरक्षा कवचामागे उभे होते. हे सुरक्षा कवच सुमारे १२ फूट उंच असल्याचे वृत्त आहे.

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याचेही वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ‘जलसा’बाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

या रविवारच्या भेटीदरम्यान अमिताभ बच्चन यांचे पुत्र आणि अभिनेता अभिषेक बच्चनही उपस्थित होते. अमिताभ चाहत्यांना अभिवादन करत असताना अभिषेक सुरक्षा व्यवस्थेवर आणि परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. या भेटीचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

विशेष म्हणजे, सुरक्षेच्या वाढीव उपाययोजना असूनही अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांशी भेटण्याची आपली जुनी परंपरा खंडित होऊ दिली नाही. मात्र, आता चाहत्यांना आणि महानायकांना यांच्यामध्ये सुरक्षा कवचाची भिंत उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे.

Back to top button