शंभर वर्षांची महालक्ष्मी पूजनाची परंपरा वाडकर कुटुंबाने ठेवली जपून

कुंभारवाडा ते साईनगरपर्यंत श्रद्धेचा अखंड प्रवास

अमरावती/2 नोव्हेंबर : काळ बदलला, पिढ्या बदलल्या; मात्र पूर्वजांकडून मिळालेला श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा आजही तितक्याच निष्ठेने जपला जात आहे. अमरावती येथील प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर फणिंद्र वाडकर यांच्या कुटुंबाने महालक्ष्मी पूजनाची शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही जतन केली आहे. ही परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून, पूर्वजांच्या आठवणी, कौटुंबिक संस्कार आणि भक्तिभावाचा अनमोल ठेवा ठरली आहे. अमरावतीतील ऐतिहासिक कुंभारवाडा परिसरातून या परंपरेची सुरुवात झाली. जवळपास शंभर वर्षांपूर्वी पूर्वजांनी स्थापन केलेले मातीचे पारंपरिक महालक्ष्मीचे मुखवटे आजही वाडकर कुटुंबाने श्रद्धेने जपून ठेवले आहेत. जुन्या काळातील कलाकुसर आणि पारंपरिक घडण असलेल्या या मुखवट्यांना धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी कुंभारवाडा परिसरात वास्तव्यास असलेले फणिंद्र वाडकर हे सध्या साईनगर, अमरावती येथे राहतात. ते गेल्या 30 वर्षांपासून महालक्ष्मी पूजनाची परंपरा निष्ठेने पुढे नेत आहेत. दरवर्षी महालक्ष्मीची विधिवत स्थापना करून पूजन केले जाते. या निमित्ताने नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तस्वकीय एकत्र येतात. त्यामुळे या धार्मिक सोहळ्याला कौटुंबिक स्नेहमेळाव्याचेही स्वरूप प्राप्त झाले आहे. या सोहळ्यात आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद हे विशेष आकर्षण असते. गेल्या तीन दशकांपासून महाप्रसादाची परंपराही सातत्याने सुरू आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचित उपस्थित राहतात. यामुळे कौटुंबिक स्नेहबंध अधिक दृढ होण्यासोबतच नव्या पिढीला परंपरेची ओळख करून दिली जात आहे.

Back to top button