अमरावतीत दिवाळी खरेदीचा 50 कोटींचा धमाका

रविवारच्या सुट्टीत बाजारपेठमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी, कपडे दागिने घरगुती वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य

अमरावती/2 नोव्हेंबर – दिवाळीचा सण जवळ येताच अमरावतीच्या बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला असून, रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत नागरिकांनी कपडे, घरगुती साहित्य, दागिने, सोने-चांदीच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे, दिवाळीच्या पारंपरिक वहीखात्यांच्या पूजनालाही व्यापार्‍यांनी पसंती दिली असून, यंदा अमरावती शहरात सुमारे 50 कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी संघटनांनी व्यक्त केला आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील घसरण, सणासाठी सुरू झालेली लगबग आणि विविध दुकानांमधील सवलती यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शनिवारपासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीला सुरुवात झाली होती. रविवारी सुट्टी असल्याने कापड बाजार, सराफा बाजार, घरगुती वस्तूंची दुकाने आणि किराणा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली. विशेषतः कापड बाजारातील नामांकित दुकानांमध्ये महिला, युवती आणि कुटुंबांनी आपल्या पसंतीचे कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी केली. आगामी दिवाळी आणि सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी तयार कपड्यांना अधिक मागणी दिसून आली. शहरातील विविध वस्त्रदालनांमध्ये ग्राहकांची रेलचेल सुरू होती. श्रद्धा होलसेल शॉपी, जवाहर रोडवरील हरिकृष्ण स्टोअर, नूतन साडी, मंगलम, सम्राट आणि शीतल या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. तसेच बिग बाजार, सिटी सेंटर आणि तापडिया सिटी सेंटरमधील दुकानांमध्येही खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचा परिणाम दिसून आला. चांदीचा दर शनिवारी प्रतिकिलो 1 लाख 84 हजार रुपयांपर्यंत खाली आल्याने ग्राहकांनी चांदीची नाणी, मूर्ती आणि इतर वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली. त्रिमूर्ती ज्वेलर्स, ए.पी. सिल्व्हर, उज्ज्वलकर सिल्व्हर, मिश्रीलाल जडिया ज्वेलर्स, मोरोडकर ज्वेलर्स आणि पूनम ज्वेलर्स येथे ग्राहकांची गर्दी होती. धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी अनेकांनी आधीच दागिन्यांची नोंदणी केली आहे. दुसरीकडे व्यापार्‍यांनी दिवाळीच्या पारंपरिक प्रथेनुसार वहीखात्यांच्या खरेदीलाही सुरुवात केली आहे. जवाहरलाल गणेशराम शर्मा, शाहीन स्टेशनर्स, नानकानी पेपर मार्ट, दी थ्री ब्रदर्स आणि साक्षी प्रॉडक्ट्स या प्रतिष्ठानांमध्ये नवीन वहीखात्यांची खरेदी करण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी नवीन हिशेबाच्या वह्यांचा वापर सुरू करणार आहेत. ग्रामीण भागातील व्यापार्‍यांकडूनही या परंपरेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, किराणा दुकानांमध्ये फराळाचे साहित्य आणि नाश्त्याच्या वस्तूंच्या खरेदीची तयारी सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत बाजारपेठेतील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

दिवाळी खरेदीत 50 कोटींच्या उलाढालीचा अंदाज

यंदाच्या दिवाळीत अमरावती शहरात सुमारे 50 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. कपडे, सोने-चांदी, घरगुती साहित्य, किराणा, सजावटीच्या वस्तू आणि वहीखात्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सणाच्या पुढील दिवसांत बाजारपेठेतील गर्दी वाढण्याची शक्यता असून, व्यापार्‍यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

Back to top button