आदिवासी कलांचा भव्य संगम; बिरसा कला संगम 2.0 उत्साहात
15 नोव्हेंबरला जनजाती गौरव दिनानिमित्त विशेष आयोजन

अमरावती/2 नोव्हेंबर – आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, पारंपरिक कला आणि लोकपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम 2.0’ हा प्रादेशिक कला महोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात 6 जिल्ह्यांतील 26 गावांच्या कलाकारांनी सहभाग घेत विविध आदिवासी नृत्य, गायन, वाद्य वादन, चित्रकला आणि हस्तकलेचे सादरीकरण केले. विजेत्या कलाकारांना 2 हजार 500 रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे निवड झालेल्या कलाकारांना राज्यस्तरीय कला महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवातून आदिवासी समाजातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमात छत्री, दांडपट्टा, चिरोळी, गदली, सुसून, होरियाल यांसह विविध पारंपरिक नृत्यप्रकार सादर करण्यात आले. तसेच फगवा गीत, कोरकू गीत, गोंड गीत, डोलार, पारंपरिक देवी जागरण, गोंडी आणि रेलापाटा या लोकगीतांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर झालेल्या कलाप्रकारांमधून आदिवासी जीवनशैली आणि संस्कृतीचे दर्शन घडले. चित्रकला आणि हस्तकलेच्या माध्यमातूनही कला कारांनी आपल्या कौशल्याची छाप उमटवली. या उपक्रमाची माहिती हर्ष खेडूलकर आणि केयूर तुलपुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, उपायुक्त प्रभुदास भिलावेकर, आ. केवलराम काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोरकू, गोंड, पावरा, आंध, भिल्ल यांसह विविध आदिवासी समाजांच्या कलांचे दर्शन या महोत्सवात घडले. सहभागी कलाकारांमधून निवड झालेल्या कलावंतांना आता राज्यस्तरीय महोत्सवात आपली कला सादर करता येणार आहे. दोन कलाकारांना विशेष प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. येत्या 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन साजरा केला जाणार असून, आदिवासी कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी अशा उपक्रमांना महत्त्व दिले जाणार आहे.





