MPSC पेपरफुटी प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता
रोहित पवारांनी तुकाराम मुंढेंकडे पुरावे सादर करत केली सखोल चौकशीची मागणी!

मुंबई / 2 नोव्हेंबर ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणात MPSC मधील काही अधिकारी आणि काही उमेदवारांना अटक करण्यात आली असली, तरी एवढ्यावरच तपास थांबता कामा नये. या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. विद्यार्थ्यांसह आपणही या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
या पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच गुन्हे शाखेने केलेल्या तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तपासातील महत्त्वाच्या बाबी समोर आल्यास या प्रकरणाची व्याप्ती स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, MPSC परीक्षांच्या OMR उत्तरपत्रिकेतील पाचवा पर्याय रद्द करण्याच्या निर्णयावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. हा पर्याय नेमका कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आला? तसेच हा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला का? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या निर्णयानंतर राज्यातील MPSC परीक्षांमध्ये गैरप्रकार करणारी टोळी सक्रिय झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात सर्व दोषींवर कारवाई व्हावी आणि परीक्षेतील पारदर्शकता कायम राहावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.





