महिलेच्या खून प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास व दंडाची शिक्षा
वरुडच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : दोन वर्षांपूर्वीचा घटना

वरुड /3 नोव्हेंबर – पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या वादात सोबत राहणार्या इसमाने महिलेची धारदार शस्त्राने हत्या करुन स्वत: विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेल्या 21 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील एकदरा येथे घडली होती. हे प्रकरणी वरुड येथील जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या दोन वर्षांपासुन सुरु होते, अखेरीत न्यायालयाने यातील आरोपी वसंता नत्थु मुंगभाते रा.तरोडा, ता.कारंजा, जि.वर्धा यास सश्रम आजन्म कारावास व 1 लाख रुपयांचा रुपये दंड, दंड न भरल्यास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सविस्तर माहीतीनुसार, तालुक्यातील एकदरा येथील मृतक महिला कमला सागर कोल्हे (30) हिचा विवाह अंदाजे 10 वर्षांपुर्वी काटोल जि.नागपुर येथील कोल्हे परिवारामध्ये झाला होता परंतु तिचा पती मद्यपी असल्यामुळे ती गेल्या काही वर्षांपासुन माहेरी भावाकडे राहत होती. गेल्या 6 महिन्यांपुर्वी तिने पासुन गावातील राऊत यांचेकडे भाड्याने खोली करुन तिच्या 9 वर्षाच्या मुलासह राहात होती. घटलेच्या 1 वर्षा पुर्वीपासुन ती वसंत मुंगभाते रा.तरोडा, भारसिंगी, जि.नागपूर याचेसोबत स्वयंपाकाचे कामासाठी बाहेर जात होती. वसंत हा अनेकदा तिला सोबत दुचाकीवर घेवुन जायचा व परत सुध्दा आणुन द्यायचा. सुमारे 1 महिन्यांपासुन वसंत हा कमला हिचेसोबत तिचे एकदरा येथे भाड्याच्या घरीच राहात होता. मागील 15 ते 20 दिवसांपासुन त्या दोघांमध्ये पैशाचे वादावरुन भांडण सुरु होते व सतत तुला मारुन टाकील, अशा धमक्या वसंत तिला देत होता.
घटनेच्या दिवशी 21 सप्टेंबर 2024 ला मध्यरात्रीच्या सुमारास कमला व आरोपी वसंत यांचे कडाक्याचे भांडण झाले व या भांडणात वसंत याने कमलाच्या गळयावर धारदार चाकूने सपासप वार केले व तो घटनास्थळावरुन पळुन गेला. त्यानंतर त्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृतक महिलेचा मुलगा दिपक याने त्याचा मामा कृष्णा याला फोन करुन आईला काही तरी झाले, असे सांगितल्यावरुन माहेरील कुटूंब घटनास्थळी दाखल झाले तर कमला ही रक्ताच्याथारोळयात घरात पडून होती. अधिक माहीती घेतली असता आईला वसंत मुंगभाते याने चाकूने मारले, असे मुलगा दिपक याने सांगितल्यानंतर पोलिसांना हीं माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मारेकरी वसंत याचा पोलिसांनी शोध सुरु केला असता वसंत हा विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात त्यांचेवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते, या प्रकरणी वरुड पोलिंसानी कृष्णा पिलाजी डांगे (24) यांचे फिर्यादीवरुन वसंत मुंगभाते विरुध्द 103 (2) बी.एन.एस.खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरण वरुडच्या जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या दोन वर्षांपासुन सुरु होते, न्यायालयाने या प्रकरणातील साक्षीदार, पुरावे आणि इतर बाबींचा विचार करुन आरोपी वसंत मुंगभाते हा दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला सश्रम आजन्म कारावास व 1 लाख रुपयांचा रुपये दंड, दंड न भरल्यास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.





